वेस्ट टू आर्ट पार्क प्रकल्प ‘कचरापेटीत’

0
18

गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने कांपाल-पणजी येथील भगवान महावीर बालविहार कला उद्यानातील अंदाजे ९ कोटी रुपयांच्या ‘वेस्ट टू आर्ट पार्क’च्या डिझाइन, अभियांत्रिकी, विकासासाठीची निविदा अखेर मागे घेतली आहे.

गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून निविदा तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात येत असून, मंडळ संबंधितांची इसारा रक्कम परत देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे, असे काल जारी केलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे.

कचरा व्यवस्थापन महामंडळाने अंदाजे ८.९२ कोटी रुपये खर्चाचा ‘वेस्ट टू आर्ट पार्क’ प्रकल्प ज्या पद्धतीने जाहीर करण्यात आला होता, त्याबाबत कलाकार आणि संबंधित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

वेस्ट टू आर्ट पार्कला अनेकांकडून विरोध करण्यात येत होता. हा प्रकल्प कांपाल येथे प्रकल्प उभारू नये, अशी अनेकांनी मागणी केल्याने हा नियोजित प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प अन्य ठिकाणी उभारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.