एटीएममधून काढले ५ हजार; मिळाले साडेबारा हजार

0
15

>> बायणा-वास्कोतील आयडीबीआय बँकेच्या एटीएममधील प्रकार; नागरिकांच्या रांगा

बायणा-वास्को येथील वाल्मिकी इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या आयडीबीआय बँकेच्या एटीएम यंत्रामधून पैसे काढणार्‍या ग्राहकांची सोमवारी रात्री चांगलीच चंगळ झाली. तांत्रिक बिघाडामुळे सदर बँकेच्या एटीएम यंत्रातून ५ हजार रुपये काढताना ग्राहकांना १२ हजार ५०० रुपये मिळाले. तसेच २ हजार रुपये काढताना ५ हजार ५०० रुपये मिळू लागले. ही बातमी वार्‍यासारखी पसरताच नागरिकांची एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी बरीच गर्दी जमली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस व बँकेच्या अधिकार्‍यांनी एटीएम बंद केले; मात्र एटीएममधून अतिरिक्त पैसे जास्त प्रमाणात काढण्याचा फायदा बायणा भागातील अनेकांनी घेतला.

बायणा येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएममधील वेगवेगळ्या कप्प्यात पाचशे, दोन हजार, शंभर रुपयांच्या नोटा योग्यरित्या ठेवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे सर्व कार्डधारकांना अतिरिक्त पैसे मिळू लागले. त्यामुळे काही आयडीबीआय बँकेच्या कार्डधारकांनी फायदा घेत तब्बल दोन-तीन वेळा एटीएममधून पैसे काढले. नंतर याची माहिती इतरांना मिळताच एटीएमसमोर कार्डधारकांची मोठ्या प्रमाणात रांग लागली. एटीएमसमोर रांग वाढत असल्याचे अखेर बँकेच्या अधिकार्‍यांना कळताच त्यांनी पोलिसांशी संपर्क केला.

बँकेच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत एटीएमची तपासणी केली असता, एटीएममधील १००, २००, ५०० आणि २००० नोटा ठेवण्याच्या कप्प्यात पैसे अदलाबदल करून ठेवल्याने कार्डधारकांना जास्त प्रमाणात पैसे मिळू लागल्याचे समोर आले. १०० रुपयांच्या कप्प्यात पाचशे रुपये, दोनशे रुपयांच्या जागी दोन हजार रुपये यामुळे कार्डधारकांना जास्त प्रमाणात पैसे मिळू लागले.

‘त्या’ ग्राहकांना पैसे परत करावे लागणार

ज्या कार्डधारकांनी दोन-तीन वेळेला पैसे काढले, त्यांना पैसे बँकेला परत द्यावे लागणार आहेत, असे वास्को पोलिसांनी स्पष्ट केले. कारण या एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने बँक त्याची पाहणी करून संबंधितांकडून पैसे वसूल करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.