८ फुटीर आमदारांविरोधात लवकरच अपात्रता याचिका

0
5

>> कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती; सभापतींकडून आवश्यक कागदपत्रे मिळाली

सप्टेंबर महिन्यात एक तृतीयांश बळाच्या जोरावर पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ८ फुटीर आमदारांविरोधात कारवाईसाठी कॉंग्रेस पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सदर आमदार आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. या संदर्भात गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काल महत्त्वपूर्ण माहिती दिली. गोवा विधानसभेच्या सभापतींकडून माहिती हक्क कायद्याखाली ८ कॉंग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबतची कागदपत्रे मिळाली असून, आता त्यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पाटकर यांनी दिली.

गेल्या सप्टेंबर महिन्यात कॉंग्रेसचे आमदार तथा तत्कालीन विरोधी पक्षनेते मायकल लोबो, दिगंबर कामत, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर आणि आलेक्स सिक्वेरा यांनी कॉंग्रेस विधिमंडळ गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

या राजकीय भूकंपानंतर राज्याच्या राजकारणासह देशात मोठी खळबळ माजली होती. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरला भारत जोडो यात्रा सुरू केल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच म्हणजेच १४ सप्टेंबरला गोव्यातील कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला होता.

सदर फुटीर आमदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची आणि पक्षांतर न करण्याची शपथ घेतली होती. ही शपथ त्यांनी मंदिर, चर्च आणि दर्ग्यासमोर घेतली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केला होता. त्या आधी जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी भाजप प्रवेशाचा त्यांनी प्रयत्न केला होता; परंतु आवश्यक संख्याबळाअभावी त्यांचा प्रयत्न फसला होता. दुसर्‍या प्रयत्नात मात्र त्यांनी कॉंग्रेसच्या ‘हातावर तुरी’ देत भाजपमध्ये प्रवेश केला. गोवा विधानसभेच्या २०२२ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला ११ जागा मिळाल्या होत्या. आता, कॉंग्रेस पक्षाचे केवळ ३ आमदार राहिले आहेत.

१० फुटीरांविरोधातील याचिका प्रलंबित;
नव्या अपात्रता याचिकेचे काय होणार?
यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये कॉंग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसच्या १० फुटीर आमदारांविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी नव्या ८ फुटीर आमदारांविरोधात याचिका दाखल केल्यास या प्रकरणाचा तरी सोक्षमोक्ष लागणार का?, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

कॉंग्रेसच्या मूळ पक्षाचे विलीनीकरण नाही : पाटकर

कॉंग्रेसच्या ८ फुटीर आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबत आम्हाला हवी असलेली आवश्यक कागदपत्रे मिळाली आहेत. त्या कागदपत्रांच्या आधारावर आता अपात्रता याचिका दाखल केली जाणार आहे. कॉंग्रेसच्या मूळ पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण झालेले नाही, असे पाटकर यांनी सांगितले.