वेस्टर्न इंडिया शिपयार्ड कामगारांचा वास्कोत मोर्चा

0
82

वेस्टर्न इंडिया शिपयार्ड कामगारांनी काल आपल्या कुटुंबियांसह शहरातून भर पावसात भव्य मोर्चा काढला. वेस्टर्न इंडिया शिपयार्डच्या व्यवस्थापन तसेच मालक ऋषी अगरवाल व भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी करीत व्यवस्थापनाच्या कृतीचा निषेध केला. कामगार व त्यांचे कुटुंबीय मिळून सुमारे तीन हजार लोकांनी मोर्चात सहभाग घेतला.

मोर्चाला सडा मुख्य नाक्यावरून सुरुवात करण्यात आली. संपूर्ण सडा भाग फिरून या मोर्चाची श्री लक्ष्मीनारायण देवस्थान परिसरात जाहीर सभेत सांगता करण्यात आली. व्यवस्थापनाने कंपनी बंद ठेऊन गेल्या दहा महिन्यांचे वेतन या कामगारांना न दिल्याने त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे या कामगारवर्गांने आंदोलन छेडून आपला निषेध यापूर्वीही व्यक्त केला आहे.
पैकी आलेक्स पाशेको आणि विष्णू नाईक या दोन नेत्यांनी पणजीत आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असा निर्धार या नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, कॉंग्रेस नेत्यांनीही धाव घेऊन भर पावसात या सर्व कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना आपला पाठिंबा दर्शविला. सरकारच्या या कृतीचा निषेध करून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न लवकरात लवकर सोडविण्यात यावा अशी मागणी केली. कॉंग्रेस नेते संकल्प आमोणकर, नगरसेविका श्रध्दा आमोणकर, सारीका पालकर, कामगार नेते ऍड. अजित सिंग राणे, सवेरा अध्यक्षा तारा केरकर आदींना आपला सक्रीय सहभाग मोर्चात दर्शवून सरकार विरोधी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.