मडकई नवदुर्गा देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांना रोखल्याने तणाव

0
89

मडकई येथील नवदुर्गा देवस्थानाचा वाद काल पुन्हा चिघळला. सहा महिन्यानंतर पोलीस बंदोबस्तात आलेल्या देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांना ग्रामस्थांनी हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. धक्काबुकी, शिवीगाळ व वाट अडविल्याप्रकरणी शैलेंद्र पणजीकर यांच्यासह इतरांवर फोंडा पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

आर्थिक अहवाल संबंधीच्या बैठकीसाठी देवस्थान समितीचे पदाधिकारी देवस्थानाच्या आवारात येताच ग्रामस्थांनी त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण ठेवल्याने प्रकरण हाताबाहेर गेले नाही. उपअधिक्षक सुनिता सावंत, उपजिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस, मामलेदार जुवाव फर्नांडिस यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली. सुमारे ५०० हून अधिक पोलीस परिसरात तैनात करण्यात आले. देवस्थान समितीचे अध्यक्ष वल्लभ कामत, साईश कामत व सुभाष कामत यांनी शैलेंद्र पणजीकर, आदित्य घैसास, राजा नाईक, हेमंत काळे, गौरव घैसास, अश्‍विनकुमार नाईक, देवेंद्र मडकईकर, सुधाकर परिट, चंदन नाईक, निखिल नाईक रायकर, विरेंद्र पणजीकर, अमर काळे, राजेंद्र नाईक, विलास नाईक, उलो गावडे, काशी गावडे, सुरेश नाईक, अलका काळे, किशोर गावडे, गुरुदास नाईक व इतरांवर दंगामस्ती, धक्काबुक्की, शिवीगाळ व वाट अडविल्याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. देवस्थान समितीने सहा महिन्यांपूर्वी अचानक धर्मिक विधी बंद केल्याने त्यानंतर सर्व धार्मिक विधी ग्रामस्थ स्वत: खर्च करून करीत आहेत. मात्र सहा महिन्यानंतर पोलीस बंदोबस्तात समितीचे पदाधिकारी देवस्थानाच्या आवारात आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसून आले.

विधानसभेत प्रश्‍न मांडणार : वाघ
मडकईतील नवदुर्गा देवस्थानाच्या परिसरात तणाव निर्माण झाल्याचे कळताच उपसभापती विष्णू वाघ यांनी मंदिराला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना नवदुर्गा देवीचा आपण भक्त असून सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात पोर्तुगीज महाजन कायदा रद्द करण्याविषयी प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.