बागा समुद्रकिनाऱ्याजवळ एका विदेशी महिलेसोबत वेश्या व्यवसायाशी निगडीत व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासकामाला सुरुवात केली आहे. बागा समुद्रकिनाऱ्यांजवळील एका विदेशी महिलेशी वेश्या व्यवसायावर बोलणी करतानाचा एका रॅकेटचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हा विभागाने व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीसह पाच जणांविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित प्रकरणाबाबत चौकशीची मागणी केली आहे. किनारी भागात वेश्याव्यवसायासाठी व्यापार परवाना दिले जात असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. दरम्यान, गोव्याच्या पर्यटन प्रतिमेच्या रक्षणासाठी वेश्याव्यवसायासंबंधीच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे.