Home बातम्या बोगस कॉल सेंटरचापर्दाफाश; 7 अटकेत

बोगस कॉल सेंटरचापर्दाफाश; 7 अटकेत

0

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने करमळी-जुने गोवे येथे एका फ्लॅटवर छापा घालून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आणि 7 जणांना अटक केली. या बनावट कॉल सेंटरमधून सुमारे 23 लाख रुपयांची यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. सायबर गुन्हा विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री 11.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ही कारवाई केली. या कारवाईमध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अन्य डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणामध्ये संशयित आरोपी म्हणून जय विजय आचार्य (रा. मुंबई), योगेश माळी (रा. अहमदाबाद), आशुतोष प्रताप (रा. अहमदाबाद), ऋषभ शहा (रा. गांधीनगर), ठक्कर पार्थ भाराभाई (रा. अहमदाबाद), एड्रियन किनस्टन मारियोसेवन (रा. मुंबई) आणि नीलेश सतीश सिंग (रा. नागपूर) यांना अटक केली. संशयित आरोपी हे ‘पेडे’ या नावाच्या कर्ज कंपनीचे एजंट असल्याचे बतावणी करून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करण्याचे काम करीत होते. कर्ज आणि त्वरित पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना सेफोरा, मॅकीस, ॲप्पल गिफ्ट कार्ड, रेझर गोल्ड, ग्रीन डॉट मनी पॅक यासारख्या कार्डच्या माध्यमातून मोठी रक्कम उकळत होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सायबर गुन्हा विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.