विस्ताराची पावले

0
130

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्ताने जोरदार कार्यक्रमांचे आयोजन येत्या काही दिवसांत करण्यात येणार आहे. देशाच्या आम आदमीला पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्राच्या दोन कोटी प्रती वाटल्या जातील, दहा कोटी मोबाईल एसएमएस पाठवले जातील, देशातील नऊशे ठिकाणी उत्सवी कार्यक्रम होतील ते वेगळेच. या सरकारने जनतेच्या आकांक्षांची पूर्तता केली आहे असेही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा काल पत्रकार परिषदेत म्हणाले. एकीकडे सरकारच्या गेल्या तीन वर्षांच्या वाटचालीचे भव्य दिव्य दर्शन जनतेला घडवत असताना भारतीय जनता पक्ष देशाच्या उर्वरित भागामध्येही आपले स्थान बळकट करण्याच्या दिशेने पावले टाकताना दिसतो आहे. काल पंतप्रधानांनी आसाम – अरुणाचल प्रदेश जोडणार्‍या, ब्रह्मपुत्रेवरील धोला – सदिया सेतूचे अनावरण केले. देशातला हा सर्वांत मोठा रस्ता वाहतुकीचा पूल आहे आणि केवळ दळणवळणाच्या संदर्भातच नव्हे, तर लष्करीदृष्ट्याही त्याचे मोठे महत्त्व आहे. आसाममधील सैन्याला गरज भासल्यास तातडीने अरुणाचलच्या चीन सीमेपर्यंत पोहोचवण्यात हा सेतू महत्त्वाची भूमिका बजावील. पण या निमित्ताने ईशान्य भारताच्या जनतेशी निकट संवाद साधण्याची संधी पंतप्रधानांनी साधली आहे. नॉर्थ ईस्ट मधल्या ‘एन ई’ चे रूपांतर त्यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात ‘न्यू इकॉनॉमी, न्यू एनर्जी’ असे केले. भारतीय जनता पक्षाने आसाम तर सर केलेच आहे, उर्वरित पूर्वांचलाच्या जनतेमध्येही स्वतःविषयी विश्वास निर्माण करण्याची ही धडपड आहे. मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येण्याचा मार्ग भाजपाच्या साथीने सुकर होऊ शकतो असा संदेशच जणू पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे ईशान्य भारताच्या आजवर स्वतःच्या कोषात राहण्यात धन्यता मानत आलेल्या जनतेला दिलेला आहे. सहा हजार कोटींच्या अन्न प्रक्रिया योजनेची घोषणा पंतप्रधानांनी काल केली, तीही ईशान्य भारताला डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती याच्या माध्यमातून सरकारच्या कल्याणयोजना ईशान्य भारतामध्ये पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो. त्यासाठी राष्ट्रीय कृषिविज्ञान संस्थेची मुहूर्तमेढही आसामात रोवली गेली आहे. दुसरीकडे, एकीकडे डाव्यांचा गड असलेल्या आणि सध्या तृणमूल कॉंग्रेसची सत्ता असलेल्या पश्‍चिम बंगालमध्येही भारतीय जनता पक्ष हळूहळू पाय रोवतो आहे. नुकतीच पंतप्रधान – ममता बॅनर्जी भेटीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जी आक्रमक निदर्शने केली, ती पाहिल्यास पश्चिम बंगालमध्ये भाजपा हळूहळू का होईना आपले पाठीराखे निर्माण करू लागलेला दिसतो. भाजपाचे आणखी एक लक्ष्य आहे ते आहे दक्षिण भारत. भाजपा आजवर उत्तर भारतीयांचा पक्ष मानला जाई. त्यामुळे दक्षिणेमध्ये त्याला कधीही समर्थन मिळाले नव्हते. परंतु भाजपाला कर्नाटकमध्ये प्रवेश करता आला. मात्र, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या चक्रात ते सरकार अडकल्याने निवडणुकीत मतदारांनी पुन्हा कॉंग्रेसच्या हाती सत्ता दिली. तरीही भाजपाचे संघटनात्मक बळ कर्नाटकात निर्माण झाले आहे. गेल्या वेळी तामीळनाडू आणि केरळमध्ये पाऊल ठेवण्याचा निकराचा प्रयत्न भाजपाने केला. एक जागा जिंकून मुहूर्तमेढ रोवली गेली. आता या दाक्षिणात्य राज्यांमध्येही आपले अस्तित्व निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न पक्षाने चालवला आहे. नुकताच अमित शहांनी तेलंगण दौरा केला, तेव्हा दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हाच इरादा व्यक्त केलेला आहे. अभिनेता रजनीकांतसारखी जनमानसावर उदंड प्रभाव असलेली व्यक्ती त्यासाठी सोबत घेण्यासाठी प्रयत्न चाललेेले दिसत आहेत. मोदी सरकारचे गेल्या तीन वर्षांतील कार्य, त्याचा प्रभाव याचा फायदा पक्ष विस्तारासाठी उठविण्याच्या दिशेने एकूण पावले पडताना दिसत आहेत!