विष्णू वाघ यांचा उपचारांना प्रतिसाद

0
101

मुंबई येथील हिंदुजा इस्पितळात उपचार चालू असलेले गोव्याचे उपसभापती विष्णू सुर्या वाघ यांच्या प्रकृतीविषयी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिली जात नसतानाच त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र वाघ यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत असल्याचे स्पष्ट केले आहे. वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ व बंधू रामराव वाघ यांनी विष्णू वाघ यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत असून त्यामुळे आशेचा किरण निर्माण झाला असल्याचे मत व्यक्त केले आहे. अरुणा वाघ यांनी सोशल मिडियावरून दिलेल्या माहितीत विष्णू वाघ उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे म्हटले आहे. कला अकादमीचे उपाध्यक्ष राजा खेडेकर यांचेही तसेच म्हणणे आहे. मात्र, हिंदुजा इस्पितळातील डॉक्टरांकडून अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, आपले पती विष्णू वाघ यांच्या प्रकृतीवरून ज्या ज्या अफवा उठवल्या जात आहेत त्या अत्यंत क्लेशदायक असून लोकांनी हे सगळे बंद करावे, अशी आपली विनंती असल्याचे अरुणा वाघ यांनी म्हटले आहे.