कळंगुट, बागा व कांदोळी किनार्‍यांवर लवकरच सीसीटीव्ही

0
99

उत्तर गोव्यातील काही प्रमुख किनार्‍यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय पर्यटन खात्याने घेतला असल्याचे खात्यातील सूत्रांनी सांगितले. या कामासाठी ‘नोडल एजन्सी’ म्हणून जीईएलची निवड करण्यात आली आहे. जीईएल्‌ने बागा, कळंगुट व कांदोळी या किनार्‍यांची सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निवड केली आहे.

गोवा पर्यटन विकास महामंडळाने अशा प्रकारचे कॅमेरे बसवण्यासाठी वागातोर, कळंगुट व बागा या किनार्‍यांची निवड केली जावी अशी शिफारस केली आहे. गजबजलेल्या किनार्‍यांवर येणार्‍या महिला पर्यटकांची छेडछाड व अशा प्रकारे त्यांना त्रास देण्याच्या घटना घडत असल्याने या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठीच हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय पर्यटन खात्याने घेतला आहे.
हे कॅमेरे व इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स यंत्रणा बसवण्यासाठी सरकारला केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेखाली पर्यटन खात्याने ३ कोटी रु.चा निधी मंजूर केला आहे. या कॅमेर्‍यांबरोबरच वरील किनार्‍यांवर वाय-फाय यंत्रणाही बसवण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागार म्हणून दाराशॉ कंपनी प्रा. लिमिटेडची नियुक्त करण्यात आली आहे.
हणजुण, बागा व वागातोर किनार्‍यांवरील पार्किंगच्या जागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी सूचनाही गोवा पर्यटन विकास महामंडळाने केली आहे. या कॅमेर्‍यांचा मॉनिटरिंग कंट्रोल रुम पर्यटन खात्याच्या पणजीतील मुख्यालयात तसेच स्थानिक कार्यालयांत स्थापन करण्यात येणार आहे. त्याशिवाय जवळपासच्या पोलीस स्थानकांवरही तो स्थापन केला जाणार आहे. यामुळे वरील किनार्‍यांवर कुणीही कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी कृत्ये करण्याचा प्रयत्न केल्यास कंट्रोल रुमला तात्काळ त्याची माहिती मिळणार आहे.