विष्णू वाघांच्या प्रकृतीविषयी अधिकृतरित्या माहिती द्या

0
86

>> विविध संघटनांची मागणी

 

मुंबई येथील हिंदुजा इस्पितळात उपचार चालू असलेले गोवा विद्यानसभेचे उपसभापती विष्णू सुर्या वाघ यांच्या प्रकृतीविषयीची माहिती अधिकृतरित्या दिली जावी, अशी मागणी गोमंतक भंडारी समाजाने काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, पणजीस्थित रुद्रेश्‍वर या नामांकीत संस्थेने आझाद मैदानावर सभा घेऊन वाघांविषयी अधिकृतपणे माहिती देण्याची मागणी केली.
वाघ यांच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली जात नसल्याने त्यांच्या प्रकृतीसंबंधी सध्या अफवा उठवल्या जात आहेत, असे भंडारी समाजाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी सांगितले. हिंदुजा इस्पितळाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांकडून वाघ यांच्या प्रकृतीसंबंधीची माहिती वेळच्या वेळी दिली जावी यासाठी गोवा सरकारने सदर इस्पितळाकडे संपर्क साधावा, अशी मागणी भंडारी समाज गोवा सरकारकडे करणार असल्याचे ते म्हणाले.
वाघ यांच्या प्रकृतीसंबंधी लोकांनी अफवा उठवू नयेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. दरम्यान, वाघ यांच्या कुटुंबीयांच्या आम्ही सतत संपर्कात आहोत. वाघ यांची प्रकृती सुधारत असल्याल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे, असे अनिल होबळे व उपेंद्र गांवकर यांनी सांगितले.
विष्णूसाठी सोमवारी लघुरुद्र
दरम्यान, विष्णू वाघ यांच्यासाठी सोमवारी हरवळे येथील रुद्रेश्‍वर देवस्थानात गोमंतक भंडारी समाज रुद्रेश्‍वर देवस्थान यांच्यावतीने लघुरुद्र करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वा. हे लघुरुद्र सुरू होईल. तर दुपारी आरती व महाप्रसाद होणार आहे. पत्रकार परिषदेला आनंद शिरोडकर, यशवंत माडकर, गुरुदास सावळ, सुभाष किनळकर, जोगु नाईक, शुभांगी कुंडईकर, संध्या पालयेंकर व सुप्रज नाईक आदी हजर होते.