वास्को टोळीयुद्धातील सहा संशयितांना अटक

0
96

वास्को पोलीस स्थानकाच्या आवारात पोलिसांसमक्ष झालेल्या टोळीयुद्धातील सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. यापूर्वी बुधवारी झुवारीनगर येथील हितेश सिंग याला अटक केली होती. काल सकाळी अटक करण्यात आलेल्यांमध्ये बसवराज शास्त्री (२३), मेहबूब शेख (२१), व्यकंटेश विश्‍वनाथ राठोड (२४), सुधीर केरकर (२०), तंगाचान उन्जीमो केरकर (२०) व गोविंद व्यंकटेश देवर (२२) या सहा जणांचा समावेश आहे.

वास्को पोलीस स्थानकाचे हवालदार विशांत गावकर, पुरुषोत्तम नाईक, दिप्तेश फडते व दिनेश नाईक यांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान, या संशयितांनी स्वत:हून पोलिसांसमोर शरणागती पत्करली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पोलीस त्यांना चेन्नईहून ताब्यात घेतल्याची चुकीची माहिती देत असल्याचे सांगण्यात आले. सर्व संशयितांनी मुंडन केले असून त्यांनी घटनेनंतर देवदर्शन घेतल्याचे
कळते.
गेल्या बुधवारी वास्को पोलीस स्थानकाच्या आवारात टोळीयुद्ध झाल्यानंतर टोळीतील सर्व युवकांनी पळ काढला होता. नवेवाडे येथे दोन्ही टोळीतील गुंडांमध्ये बाचाबाची होऊन मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. यानंतर एका टोळीतील दोन-तीन युवक दुचाक्यांवरून वास्को पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवण्यासाठी आले होते. त्यावेळी दुसर्‍या टोळीतील युवकांनी पाठलाग करीत पोलीस आवारात सांतान कुरैय्या याला दंडुके, चाकू व इतर वस्तूंनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. पोलिसांसमोर ही घटना घडली होती. पोलिसांनी हल्ल्यावेळी वापरलेला चाकू जप्त केला होता. मात्र, हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. या प्रकरणी पोलिसांनी एकूण वीस युवकांवर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, टोळीयुद्धातील आणखी वीस संशयितांच्या मागावर वास्को पोलीस असून त्यांनाही लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक सुरज काणकोणकर यांनी दिली.