विराटविना टीम इंडियाची सत्त्वपरीक्षा

0
236

>> ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून

>> गिल, सिराज करणार कसोटी पदार्पण

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून खेळविला जाणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे टीम इंडियाचे नेतृत्व करणार असून बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर त्याच्या नेतृत्वगुणांचा कस लागणार आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यामुळे ०-१ अशा पिछाडीवर असलेली टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणार असून दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ २-० अशा आघाडीसाठी प्रयत्नशील असेल.

भारताने या सामन्यासाठी संघात चार बदल केले आहेत. यातील दोन बदल अनिवार्य होते. विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर गेला असून मोहम्मद शमी मनगटाच्या दुखापतीमुळे जायबंदी झाला आहे. या दोघांची जागा अनुक्रमे अष्टपैलू रवींद्र जडेजा व मोहम्मद सिराज यांनी घेतली आहे. सिराजच्या रुपात नवोदित कसोटी पदार्पण करणारा गोलंदाज असल्याने भारताला नाईलाजास्तव स्पेशलिस्ट फलंदाज लोकेश राहुलऐवजी रवींद्र जडेजाला संघात घ्यावे लागले. जसप्रीत बुमराह याने अजूनपर्यंत कधीही कसोटीत भारतीय गोलंदाजांचे नेतृत्व केलेले नाही. प्रत्येकवेळा त्याच्या जोडीला शमी व इशांत किंवा यांच्यापैकी एक असायचा. परंतु, यावेळी त्याच्यावर अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात त्रिफळाबाद झालेल्या पृथ्वी शॉ याला अपेक्षेप्रमाणे आपली जागा गमवावी लागली आहे. त्याच्या जागेवर शुभमन गिल याला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. २००१ नंतर एकाच कसोटीत दोन खेळाडूंना विदेशात कसोटी पदार्पणाची संधी देण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. २००१ साली वीरेंद्र सेहवाग व दीप दासगुप्ता यांनी द. आफ्रिकेविरुद्ध तर २०११ साली वेस्ट इंडीजविरुद्ध अभिनव मुकुंद व प्रवीण कुमार यांनी कसोटी पदार्पण केले होते. वृध्दिमान साहा याला वगळण्याचा निर्णय धाडसी ठरला. संघ व्यवस्थापनाने साहाच्या यष्टिरक्षण कौशल्यापेक्षा पंतच्या बेभरवशी आक्रमकतेवर विश्‍वास ठेवल्याचे संघ निवडीवरून दिसून आले. प्रमुख सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तसेच नवोदित विल पुकोवस्की तंदुरुस्त नसल्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीतील संघच कायम ठेवण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज भन्नाट फॉर्ममध्ये असून प्रथम फलंदाजी मिळाल्यास केवळ एकदाच फलंदाजी करून भारतावर डावाने विजय मिळविण्याचा कांगारूंचा इरादा असेल.

मोहम्मद सिराज
सिराजचा गोलंदाजीतील वेग मोहम्मद शमीच्या जवळपास जाणारा नाही. शमी हा जलदगती गोलंदाज असून सिराज जलद मध्यमगती प्रकारात मोडतो. सिराजला नव्या चेंडूकडून काही वेळा मदत मिळते. विशेषकरून इनस्विंगने तो फलंदाजाला चकवू शकतो. प्रथमश्रेणी, ‘अ’ दर्जाचा सामना, वनडे असो किंवा आयपीएल सिराजचा पहिल्या स्पेलमधील टप्पा दुसर्‍या स्पेलच्या तुलनेत चांगला असतो. दुसर्‍या स्पेलमध्ये त्याची दिशा अनेकवेळा भरकटते. त्यामुळे पहिल्या स्पेलमधील दबाव राखण्यात तो यशस्वी होत नसल्याचे दिसून आले आहे. फलंदाजांनी आक्रमक पवित्रा अवलंबल्यास सिराजची दिशा हमखास बिघडते. त्यामुळे धावा रोखणे कठीण बनते. दुसर्‍या टोकाने उमेश यादव सारखा धावांची खैरात करणारा गोलंदाज असला तर सिराजला अधिक बिकट परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. विशेषकरून स्टीव स्मिथ व लाबुशेन त्याच्या गोलंदाजीवर तुटून पडू शकतात.

शुभमन गिल
एकवीस वर्षीय शुभमन गिल याने देशांतर्गत क्रिकेटमधील आपल्या छोटेखानी कारकिर्दीत दमदार प्रदर्शन केले आहे. भक्कम तंत्र व मोठी खेळी करण्याची भूक त्याच्या खेळात दिसली आहे. १९ वर्षांखालील संघाकडून केलेली कामगिरी तसेच २०१८-१९ देशांतर्गत मोसमातील चमकदार कामगिरीमुळे अल्पावधीतच त्याला टीम इंडियाचे दरवाजे खुले झाले. भारताच्या वनडे संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला लाभली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ६८.७८ ची सरासरी त्याची क्षमता दाखवण्यास पुरेशी आहे. सात शतके त्याच्या नावावर असून २६८ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. विदेशात विशेषकरून हलत्या चेंडूचा सामना गिल याने फारसा केलेला नाही. त्यामुळे त्याच्या कच्चा दुव्यांबद्दल सांगणे कठीण आहे. दोन वर्षांत तीन वनडे सामन्यांत दोन वेळा तो नव्या चेंडूवर बाद झाला आहे. पण, या फार कमी संधींवरून त्याची पारख करणे चुकीचे ठरू शकते. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताची मधली फळी कमकुवत बनली आहे. त्यामुळे जगातील सर्वोत्तम गोलंदाजी फळी असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ गिलला लवकर बाद करून संघाला पुन्हा एकदा शानदार सुरुवात देण्याचा प्रयत्न करणार आहे. कमिन्स, स्टार्क, हेझलवूड या त्रिकुटासमोर गिलने आपला नैसर्गिक खेळ दाखवल्यास भारताला चांगली सुरुवात मिळू शकते.