Home Featured विधानसभेसाठी अनेक माजी आमदार इच्छुक

विधानसभेसाठी अनेक माजी आमदार इच्छुक

0

निवडणुकीसाठी अनेक नेत्यांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अन्य एक माजी मुख्यमंत्री, माजी खासदार व ज्येष्ठ काँग्रेस नेते चर्चिल आलेमांव, भाजपचे एक ज्येष्ठ नेते व माजी आमदार व माजी मंत्री दिलीप परुळेकर, भाजपचे माजी आमदार, माजी मंत्री, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, भाजपचे माजी आमदार दयानंद सोपटे हे गोवा विधानसभेची पुढील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, तसे असेल तरी यापैकी काहीजणांनी वेगळ्या प्रकारची भूमिका घेतलेली असून परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याचीही तयारी ठेवलेली आहे.

सोपटे व मी एकत्र ः पार्सेकर
मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार व गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वरील प्रकरणी काल दै. नवप्रभाशी बोलताना, मांद्रे मतदारसंघाचे विद्यमान आमदार जीत आरोलकर, यांची सध्या मतदारसंघामध्ये दादागिरी व एकाधिकारशाही वाढत चालली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत पुढील गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे व आपण एकत्र आलो असल्याचे सांगून पुढील निवडणुकीत आम्हा दोघांपैकी कोणीतरी एकटा निवडणूक लढवील. एक तर सोपटे लढवतील किंवा आपण तरी. तिरंगी लढत झाल्यास तिसऱ्या उमेदवाराचा फायदा होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

यासंबंधी आमच्या प्रतिनिधींनी मांद्रेचे दुसरे माजी आमदार दयानंद सोपटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मांद्रेचे माजी आमदार व गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे एक ज्येष्ठ असे नेते असून त्यांच्या मताशी आपण पूर्ण सहमत आहे. त्यांचा आपण आदर करीत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्याचबरोबर या प्रश्नी आपण आणखी काही बोलण्याची गरज आहे, असे आपणाला वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट
केले.

भाजपची उमेदवारी
हवी : परुळेकर

भाजप नेते, शिवोली मतदारसंघाचे माजी आमदार व माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी या प्रकरणी दै. नवप्रभाशी बोलताना, 2022 साली भाजपने मला उमेदवारी नाकारली होती. माझ्याऐवजी तेव्हा गोवा फॉरवर्ड पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयेश साळगांवकर यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यावेळी माझ्यावर अन्याय झाला होता. आपण त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली कैफियत मांडली असता त्यांनी त्यावेळी मला पक्षाचा उमेदवार या नात्याने जयेश साळगांवकर यांना पाठिंबा देण्याची सूचना केली होती आणि पुढील निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पक्षाने शिवोलीतून आपणाला उमेदवारी द्यावी. आपणाला निवडणूक लढवायची असून ती भाजपच्याच उमेदवारीवर लढवायची आहे आणि पक्ष आपणाला उमेदवारी देईल, असा विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप-मगोचा उमेदवार
म्हणून उतरणार : दीपक

मगो पक्षाचे आमदार व माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी आपण गोवा विधानसभेची पुढील निवडणूक लढवणार असून भाजप-मगो युतीचा उमेदवार म्हणून मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. प्रियोळ मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या दीपक ढवळीकर यांनी आपण यंदा कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे हे आताच सांगू शकत नसल्याचे स्पष्ट केले.