Home Featured फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 18 जणांचा मृत्यू

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 18 जणांचा मृत्यू

0

तामिळनाडूमध्ये तीन महिलांसह सहाजण गंभीर

तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात काल रविवारी झालेल्या स्फोटात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी कारखान्यात 30 कामगार कामावर होते. त्यातील सहाजण गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे; या महिलांचे शरीर सुमारे 60 टक्के भाजले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आग विझवण्यासाठी आणि ढिगारा हटवण्यासाठी अग्निशामक दल व बचाव पथके गेल्या अनेक तासांपासून काम करत आहेत. सुरुवातीच्या स्फोटानंतरही फटाके फुटणे सुरूच होते, ज्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला. प्राथमिक तपासाद्वारे, कारखान्याच्या समोरील भागात हा स्फोट झाला, जिथे कामगार कच्च्या मालाचे काम करत होते असे समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शोक
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी या दुर्घटनेत अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रति माझ्या सखोल संवेदना व्यक्त करतो असे म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून सर्व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे आणि समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.