विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चाचपणी

0
91

>> राष्ट्रीय सरचिटणीस, गोवा प्रभारींकडून मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांशी संवाद साधून आगामी २०२२ च्या विधानसभेच्या रणनीतीबाबत चर्चा केली. केंद्रीय नेत्यांनी राज्यमंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करून मंत्र्यांच्या विचार, सूचना जाणून घेतल्या आहेत. प्रियोळचे अपक्ष आमदार तथा सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस संतोष यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली आहे.

तर भाजपमध्ये प्रवेश ः गावडे
भाजप पक्ष संघटनेने मान्यता दिल्यास आपण भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, असे मत सहकारमंत्री गावडे यांनी केंद्रीय नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केले. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. भाजप सरकारमध्ये गेली ४ वर्षे मंत्री म्हणून कार्यरत आहे. आपण अजूनपर्यंत भाजपशी एकनिष्ठ आहे. पुढील निर्णय भाजप पक्ष संघटनेने घ्यावा असे मंत्री गावडे म्हणाले.

जिंकणार्‍यांनाच उमेदवारी द्या ः लोबो
भाजपने जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली पाहिजे, असे मत मंत्री मायकल लोबो यांनी काल व्यक्त केले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि गोवा प्रभारी यांच्यासमोर हे मत व्यक्त केले असल्याचेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

केंद्रीय नेत्यांनी मतदारसंघात भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेण्याची सूचना केली, अशी माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी दिली.

नीलेश काब्राल यांनी, संघटन व सरकार निवडणुकीवर चर्चा झाली असून वर्ष २०२२ मध्ये भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी रणनीतीवर चर्चा केल्याचे सांगितले.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केंद्रीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आपणाला बोलण्याचा अधिकार नाही, अशी मोघम प्रतिक्रिया दिली व ते निघून गेले.

लसीकरणाबाबत जनजागृती
करण्याची सूचना ः तानावडे

राष्ट्रीय नेत्यांनी कारोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची सूचना केली, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस संतोष यांनी भाजपचे आमदार, भाजपच्या गाभा समितीच्या पदाधिकार्‍यांशीही चर्चा केली आहे.

मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांत मतभेद नाहीत ः रवी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्वजण एकत्रितपणे कार्य करीत आहोत, अशी माहिती गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. या विषयावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बुधवारीच स्पष्टीकरण केलेले आहे. भाजप निवडणुकीसाठी सदैव तयार असतो. तसेच, पक्ष संघटनेला उभारी देण्याचे काम केले जाते. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून भाजप आमदारांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काही सूचना करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती यावेळी श्री. रवी यांनी दिली.