बिहारच्या सुधारित आकडेवारीमुळे देशात गुरूवारी कोरोनाचे ६१४८ मृत्यू

0
95

भारतात गेल्या २४ तासात तब्बल ६१४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून आतापर्यंतचे हे सर्वात जास्त मृत्यू आहेत. बिहारमधील समावेश नसलेल्या ३९५१ मृत्यूंचा समावेश कालच्या संख्येत झाल्यामुळे मृत्यूचा आकडा अचानक एवढा वाढला आहे. मात्र बिहारमधील सुधारित आकडेवारी वगळल्यास गेल्या २४ तासांत एकूण २१९७ एवढे मृत्यू झाले आहेत.

बिहारने बुधवारी करोना मृतांची सुधारित आकडेवारी जाहीर केली. यामुळे बिहारमधील एकूण मृत्यू ९४२९ एवढे झाले आहेत. दरम्यान, बिहारमधील ३९५१ पैकी बहुतांश मृत्यू हे दुसर्‍या लाटेतच झाले आहेत. बिहारमध्ये ७ जूनपर्यंत मृतांचा एकूण आकडा ५४२४ एवढा होता, तर गेल्या २४ तासात २० जणांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक मृत्यू असलेल्या राज्यांमध्ये बिहार आता १७ वरून १२ व्या क्रमांकावर आले आहे. या अतिरिक्त आकडेवारीने बिहारमधील कोरोना मृत्यूंचे प्रमाण ४२.१ टक्क्यांनी वाढले आहे.

महाराष्ट्रातही मृत्यूंत वाढ
बिहारसोबतच सर्वच राज्ये सुधारित आकडेवारी जाहीर करत आहेत. गेल्या १२ दिवसांत महाराष्ट्रातही ५००० मृत्यूंची सुधारित आकडेवारीतून वाढ झाली आहे. १७ मे ते २८ मे या काळात महाराष्ट्राच्या मृतांच्या आकडेवारीत ११७१२ मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ६६२२ दैनंदिन होणारे मृत्यू आहेत, तर ५०९० मृत्यू सुधारित आकडेवारीतून समोर आले. मृतांचे आकडे समोर न येण्यामागे तांत्रिक अडथळे आणि आरोग्य यंत्रणेवरील अतिरिक्त ताण असे कारण अधिकार्‍यांकडून देण्यात आले आहे.