विद्यालयांना देखभाल निधीचा दुसरा हप्ता मार्च अखेरपर्यंत

0
187

>> मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्‍वासन

राज्यातील विद्यालयांना जो देखभाल निधी दिला जातो त्यातील गेल्या वर्षीचा जो दुसरा हप्ता शिल्लक आहे तो त्यांना मार्च महिन्यापर्यंत देण्यात येणार आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिले. विद्यालयांना संगणक, प्रयोगशाळा व सीसीटीव्हीसाठी निधी देण्यास पुढील अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, अशी माहिती काल शिक्षणमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला दिली. आमदार सुदिन ढवळीकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

विद्यालयांना देखभालीसाठी देण्यात येणारा हा निधी मिळाला नसल्याचे ढवळीकर यांचे म्हणणे होते. त्याविषयी बोलताना प्रमोद सावंत म्हणाले की, विद्यालयांना देखभालीसाठी देण्यात येणारा पहिला हप्ता देण्यात आला आहे. महामारीच्या समस्येमुळे दुसरा हप्ता देण्यात आलेला नाही. तो हप्ता मार्च महिन्यापर्यंत देण्यात येईल. काही विद्यालयांनी पहिल्या हप्त्याचा कोणत्या कामासाठी वापरण्यात आला त्यासाठीचे प्रमाणपत्र दिलेले नाही. ते देण्यात आल्यानंतर त्यांना दुसरा हप्ता देण्यात येईल असे सावंत म्हणाले.