फोंडा परिसरातील एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास बारावीच्या परीक्षेच्या निकालाच्या भीतीने घराच्या छपरावरून उडी मारली. त्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले; पण डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. फोंडा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. त्यापूर्वी सदर विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी छपरावरून उडी घेऊन जीवनाचा अंत केला. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला सुरुवातीला उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले; पण तेथे त्याचा मृत्यू झाला. बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी होणार असून, त्यात काय होईल या भीतीने सदर विद्यार्थ्याने जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.