डॉलरच्या तुलनेत प्रति डॉलर 93 च्या पार
भारतीय रुपया इतिहासात पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर घसरला असून, प्रथमच प्रति डॉलर 93 चा टप्पा ओलांडला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ यामुळे रुपयाची घसरण कायम राहिली आहे. अमेरिका – इस्रायलविरुद्ध इराण संघर्ष सलग तिसऱ्या आठवड्यात देखील सुरू असल्याने ऊर्जा संकट गडद झाले आहे. पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्या आहेत. या सर्वांचा प्रभाव शेअर बाजारावर दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 93.15 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झाली आहे. पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या भीतीने ‘ब्रेंट क्रूड’चे दर प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या वर गेले आहेत. रुपयाची ही घसरण थांबवण्यासाठी आणि त्याला स्थिर करण्यासाठी आता भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) बाजारात काही हस्तक्षेप करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सुरक्षित गुंतवणुकीकडे कल भूराजकीय अनिश्चिततेमुळे जागतिक गुंतवणूकदार ‘अमेरिकन डॉलर’सारख्या सुरक्षित पर्यायांकडे वेगाने वळत आहेत, ज्यामुळे डॉलर अधिक मजबूत होत आहे आणि रुपयासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेतील चलनांवर मोठा दबाव येत आहे.
विदेशी गुंतवणूकदारांची माघार
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. पैसे काढताना ते रुपयाचे रूपांतर डॉलरमध्ये करत असल्यामुळे रुपयाची घसरण आणखी वेगवान झाली आहे.
रुपया 95 पर्यंत घसरण्याची भीती
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया पुढच्या वर्षांपर्यंत 95 रुपयांपर्यंत घसरण्याची भीती ब्लूमबर्गने व्यक्त केली आहे. इराण संघर्षामुळे महागाई वाढल्यास केंद्रीय बँकेवर दबाव येईल, असे गोल्डमन सॅक्सने ब्लूमबर्गला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. सध्या महागाई नियंत्रणात असली तरी, तेलाच्या वाढलेल्या किमती आणि रुपयाच्या घसरणीचा परिणाम ग्राहक किमतींवर झाल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेला कठोर धोरणे राबवावी लागतील, असे गोल्डमन सॅक्सचे व्यवस्थापकीय संचालक शांतनू सेनगुप्ता यांनी सांगितले.