विझलेला चिराग

0
56

राजकारण हे कोणत्या थराला जाऊ शकते आणि रक्ताच्या नात्यावरही कसे मात करू शकते त्याचा दाहक प्रत्यय सध्या स्व. रामविलास पास्वान यांचे चिरंजीव चिराग घेत आहेत. पित्याच्या मृत्यूनंतर लोकजनशक्ती पक्षाचे नेतृत्व करून त्यांचा वारसा चालवणार्‍या चिराग यांची काल पक्षाध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली आणि त्यांच्याविरुद्ध हे बंड पुकारणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचे काका पशुपतीकुमार पारस हेच ठरले आहेत. परवा जेव्हा पक्षाच्या लोकसभेच्या सहा खासदारांपैकी स्वतः चिराग वगळता इतर पाचही जण चिराग यांच्या विरोधात गेले आणि पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून त्यांना हटवण्यात आले, तेव्हाच काकांनी त्यांच्यावर वरताण केल्याचे स्पष्ट झाले होते. चिराग यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दिल्लीत जातीने धाव घेतली आणि आपल्या आईला रीना पास्वान यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपविण्यात यावे असा प्रस्ताव देत तडजोड करण्याचा प्रयत्न केला, पण काकांनी त्यांना भेटही न घेता परत पाठवणी केली! काल चिराग यांनी पक्षाच्या पाच खासदारांना पक्षातून काढून टाकत असल्याचे जाहीर केले, परंतु विरोधी गटाने लोजपच्या कार्याध्यक्षपदी सूरज भान यांना नेमून नव्या पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरूही केली आहे. ज्या मानहानीकारक प्रकारे चिराग पक्षामध्ये एकाकी पडले आहेत, तो त्यांच्यासाठी मोठा धडा आहे, कारण ह्याच आपल्या काकांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये एका टीव्ही वाहिनीवर नितीशकुमार यांची प्रशंसा केल्याने चिरागने त्यांना जाहीरपणे अपमानीत केले होते.
लोकजनशक्ती पक्ष हा खरे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष. त्यामुळे भाजपशी हातमिळवणी करून गेली बिहार विधानसभा निवडणूक लढविणार्‍या नितीशकुमार यांच्या जेडीयूला पाठिंबा देणे हे चिराग यांचे कर्तव्य होते, परंतु आपण मोदींसमवेत जरी असलो, तरी नितीश यांना आपण पाठिंबा देऊ शकत नसल्याचे सांगून चिराग यांनी त्या निवडणुकीत सर्वत्र आपले उमेदवार उभे केले होते. २४३ पैकी १४३ ठिकाणी उमेदवार उभे करूनही पक्षाचा केवळ एकमेव उमेदवार तेव्हा निवडून येऊ शकला, तोही यंदा जेडीयूत सामील झाला आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत जेडीयूला अनेक ठिकाणी लोकजनशक्ती पक्षाच्या उमेदवारांनी फटका दिला होता. पास्वान यांच्या पक्षाने अनेक ठिकाणी दलित मते खेचून घेत नितीश यांच्या उमेदवारांपुढे समस्या निर्माण केली होती. नितीशकुमार ह्याचा वचपा काढण्याची संधी शोधत होते, ती यावेळी त्यांना मिळाल्याचे दिसते. रामविलास यांचे बंधू पशुपतीकुमार यांच्याकडे लोकजनशक्ती पक्षाची धुरा जावी ह्यासाठी त्यांच्या पक्षामध्ये सर्वसहमती बनविण्यात आणि चिराग यांना सर्वस्वी एकाकी पाडण्यात नितीश यांचे सहकारी व आमदार लल्लन सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते.
कौटुंबिक स्वरूपाच्या पक्षांमध्ये अशा प्रकारची भाऊबंदकी काही नवी नाही. शेजारच्या उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यांचे पुत्र अखिलेश यांना काका शिवपालसिंग यादव यांच्याशी कसा सामना करावा लागला होता हे सर्वविदित आहे. शिवपाल यांनी नंतर स्वतःचा प्रगतिशील समाजवादी पक्ष काढून पाहिला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही आणि शेवटी पुतण्याशीच हातमिळवणी करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली. चिराग यांचे काका मात्र धुरंधर निघाले आहेत. त्यांनी चिराग यांनाच अस्मान दाखवून दिले आहे. काका – पुतण्याचा संघर्ष केवळ पेशवाईतच उद्भवतो असे नव्हे. पास्वानांपासून पवारांपर्यंत तो अनेकदा दिसून आला आहे. एखाद्या पक्षात अशा प्रकारची कौटुंबिक बंडखोरी आजच घडते आहे असेही नव्हे. तामीळनाडूत एम. जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर पत्नी जानकी रामचंद्रन यांच्यावर जयललितांनी केलेली कुरघोडी किंवा आंध्रमध्ये एन. टी. रामाराव यांची द्वितीय पत्नी लक्ष्मीपार्वती शिरजोर होताच जावई चंद्रबाबू नायडूंनी केलेेले बंड अशी अनेक उदाहरणे देशाच्या प्रादेशिक राजकारणात सापडतील. शेवटी राजकारणात महत्त्वाची ठरत असते ती सत्ता आणि त्यायोगे येणारी संपत्ती आणि अधिकार. त्यासाठी एकमेकांच्या उरावर बसायला कोणी मागेपुढे पाहात नाही. रक्ताची नातीही मग नाती राहात नाहीत. चिराग यांच्या बाबतीत हेच घडले आहे. पिता रामविलास पास्वान अत्यंत शांत, संयमी नेते म्हणून सर्वपरिचित होते. राजकारणाच्या बदलत्या दिशांचा त्यांचा अभ्यास तर पक्का असे. म्हणूनच त्यांना ‘मौसम वैज्ञानिक’ संबोधले जायचे. कधी वाजपेयींसोबत, कधी मनमोहनसिंगांसोबत, कधी मोदींसोबत. वारा वाहेल त्या दिशेने त्यांनी आपले सूप धरले आणि त्यात ते सदैव यशस्वीही होत गेले. चिराग उच्चविद्याविभूषित खरे, परंतु पित्याची ही दूरदृष्टी आणि सर्वसमावेशक वृत्ती काही त्यांना दाखवता आली नाही. राजकारणातील खाचाखोचा कळण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवाची गरज असते. राजकारण हे पाठ्यपुस्तकांतून शिकता येत नाही. त्यामुळे शेवटी त्यांच्या काकांनीच त्यांना पक्षामध्ये एकाकी पाडून पक्षच हस्तगत केला आहे. नितीशकुमार दूरवर राहून गालातल्या गालात हसत ह्या राजकीय घडामोडींचा आनंद घेत असतील!