विजेवरील चर्चेत दाव्या-प्रतिदाव्यांच्या ठिणग्या

0
97

मोफत वीज देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर आप आणि भाजपमध्ये वादाला तोंड फुटले होते. या पार्श्‍वभूमीवर आपने वीजमंत्री नीलेश काब्राल यांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले होते. ते आव्हान काब्राल यांनी स्वीकारल्यानंतर काल पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात मोफत वीजपुरवठ्याबाबत जोरदार चर्चा झाली. यावेळी आपचे नेते तथा दिल्लीतील वीजमंत्री सत्येंद्र जैन आणि नीलेश काब्राल यांनी दावे-प्रतिदावे करत आपलीच बाजू लावून धरली. दरम्यान, आयएमबी सभागृहाबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चर्चा संपल्यानंतरही सभागृहाबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मोफत वीज अशक्य
नीलेश काब्राल

रीत आहे. गोव्याच विजेचे उत्पादन होत नाही. त्यामुळे गोवा सरकार राज्यातील जनतेला मोफत वीज देऊ शकत नाही, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल नवी दिल्लीचे वीजमंत्री सत्येंद्र जैन यांच्याबरोबरच्या चर्चेत बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील जनतेला जर मोफत वीज दिली, तर सरकारला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे मोफत वीज देणे शक्य नसल्याचे काब्राल यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढील ५ वर्षे वीज दरवाढ नाही
भाजप सरकार पुढील ५ वर्षे राज्यात वीज दरवाढ करणार नसल्याचे आश्‍वासन काब्राल यांनी यावेळी दिले. अर्थातच त्यांचे सरकार सत्तेवर आले तर असे त्यांना म्हणायचे होते. विजेसाठी ५ हजार कोटी रुपयांचे अनुदान सरकार देते. हे अनुदान दिल्ली सरकारपेक्षा जास्त असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

शेतकर्‍यांना वीज अनुदान
गोवा सरकार शेतकर्‍यांना मोफत वीज देत नाही; मात्र त्यांना विजेसाठी अनुदान देते. विजेसाठी सौर उर्जेचे पॅनेल बसवणे तसेच त्यासाठी लागणारे अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी सरकार त्यांना अनुदान देते. सौर ऊर्जेची सोय झाली की त्यांना आपोआप मोफत वीज मिळते, असेही त्यांनी सांगितले.

…तर प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होणार
वीज बिल भरू न शकल्याने ज्यांची बिले थकली आहेत, अशा लोकांसाठी एकरकमी योजनाही सरकारने लागू केली आहे. त्याचा लाभ ग्राहकांकडून घेतला जात आहे; मात्र अरविंद केजरीवाल हे जसे म्हणतात तशी लोकांची बिले माफ केली, तर जे लोक प्रामाणिकपणे बिले भरतात, त्या लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल, असे काब्राल यांनी सांगितले.

अन्य योजनांचा लाभ देतोय
राज्यातील भाजप सरकार जनतेला वीज मोफत देत नाही हे खरे आहे. मात्र, आम्ही राज्यातील जनतेला गृह आधार, लाडली लक्ष्मी अशा योजनांचा फायदा दिला असल्याचे काब्राल यांनी यावेळी सांगितले.

पुढील २ वर्षांत २४ तास अखंडित वीजपुरवठा
राज्यातील जनतेला २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यास सरकारला यश आले नसल्याचे मान्य करून, पुढील २ वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे काब्राल यांनी यावेळी स्पष्ट केले. गोवा सरकार छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश या हजारो किमी. दूर असलेल्या राज्यांकडून वीज मिळवते. त्यामुळेही वीज वहनात व्यत्यय येत असल्याचा दावा त्यांनी केला.

मोफत वीज देणारच
सत्येंद्र जैन

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तर जनतेला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. तसेच ३०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणार्‍यांना ज्या ग्राहकांना बिल भरावे लागणार आहे, त्यांच्या बिलात पुढील ५ वर्षांपर्यंत कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. तसेच पक्ष सत्तेवर आल्यापासून २ वर्षांच्या आत राज्यातील लोकांना २४ तास अखंडित वीजपुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन आपचे नेते तथा दिल्लीचे वीजमंत्री सत्येंद्र जैन यांनी काल वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याबरोबर वादविवाद चर्चेवेळी आपल्या पक्षाची बाजू मांडताना दिले.

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपचे सरकार दिल्लीतील जनतेला मोफत वीज देऊ शकते, तर गोव्यातील भाजप सरकार गोमंतकीय जनतेला वीज मोफत का देऊ शकत नाही, असा सवाल जैन यांनी केला. आपचे सरकार राज्यात सत्तेवर आले, तर गोव्यात ‘दिल्ली मॉडेल’च्या धर्तीवर ‘गोवा मॉडेल’ तयार करून राज्यातील जनतेला मोफत वीज दिली जाईल, असे जैन यांनी सांगितले.
…अन् केजरीवाल यांनी आव्हान स्वीकारले
देशात जेव्हा भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चालू होते, तेव्हा काही नेत्यांनी केजरीवाल यांना तुम्ही राजकारणात प्रवेश करा व सत्तेवर येऊन भ्रष्टाचारमुक्त प्रशासन चालवून दाखवा, असे आव्हान त्यांना दिले होते. त्यांनी ते आव्हान स्वीकारत नवी दिल्लीत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन चालवून दाखवल्याचे जैन यांनी सांगितले.
दिल्ली सरकारही परराज्यांकडून
वीज खरेदी करते

गोवा सरकारप्रमाणेच दिल्ली सरकारही परराज्यांकडून वीज खरेदी करीत आहे. आम्ही बिहार, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश आदी राज्याकंडून वीज खरेदी करीत आहोत आणि असे असूनही आम्ही दिल्लीतील जनतेला मोफत वीज देत आहोत. त्यामुळे गोवा सरकार परराज्यातून वीज खरेदी करीत असल्याने ते राज्यातील जनतेला मोफत वीज देऊ शकत नाही, असे कसे सांगू शकते. आम्ही देऊ शकतो, तर गोव्याला ते देणे का शक्य होत नाही, असा सवाल त्यांनी काब्राल यांना केला.

आगामी २ वर्षांत अखंडित वीजपुरवठा
गोव्यातील ८७ टक्के ग्राहक हे प्रत्येकी ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापरत आहे. त्यामुळे त्यांना बिल भरावे लागणार नाही. तसेच आपचे सरकार गोव्यात सत्तेवर आल्यापासून पुढील २ वर्षांच्या काळात राज्याला २४ तास अखंडित वीजपुरवठा केला जाईल. तसेच राज्यातील शेतकर्‍यांना पूर्णपणे वीज मोफत देण्यात येईल, असा दावा जैन यांनी केला.

आप-भाजप आपापल्या भूमिकेवर ठाम

नीलेश काब्राल
केवळ मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांनाच मोफत वीज
गोव्यात कुणालाही मोफत वीज मिळत नसल्याचे काब्राल यांनी सांगितले, त्यावर सत्येंद्र जैन यांनी गोव्यात मंत्र्यांना मोफत वीज मिळत असल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिले. त्यावर उत्तर देताना, मंत्र्यांची जी शासकीय निवासस्थाने आहेत, त्या निवासस्थानावरील विजेचे बिल तेवढे सरकार फेडते, असे काब्राल यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून वीज दर वाढवलेले नाहीत
गोवा सरकारने गेल्या कित्येक वर्षांत विजेचे दर वाढवलेले नाहीत. आता लोक जास्त वीज वापरत आहेत. त्यामुळेच त्यांना जास्त वीज बिल येत असल्याचा दावा वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी त्यासंबंधी विचारलेल्या एका प्रश्‍नावर उत्तर देताना केला.

सत्येंद्र जैन
मंत्र्यांना मोफत वीज; मग जनतेला का नाही
गोव्यातील मंत्र्यांना वीज मोफत दिली जाते; मग जनतेला ती मोफत का दिली जात नाही. त्यांना विजेसाठी पैसे का भरावे लागतात, असा सवाल जैन यांनी केला. दिल्लीत २०० युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या ग्राहकांना सरकार मोफत वीज देत असून, २०० ते ४०० युनिटपर्यंत वीज वापरणार्‍यांना बिलाचे केवळ अर्धे पैसे भरावे लागत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

दिल्लीत गेल्या ७ वर्षांपासून वीज दरवाढ नाही
दिल्ली सरकारने गेल्या ७ वर्षांपासून वीज दरात वाढ केलेली नाही. आपचे सरकार भ्रष्टाचार करीत नाही आणि म्हणूनच दिल्ली सरकारला मोफत विजेसारख्या कल्याणकारी योजना राबवताना अडचण येत नाही. केजरीवाल सरकारने जी-जी आश्‍वासने जनतेला दिली होती, ती सगळी पूर्ण केली असल्याचा दावाही जैन यांनी यावेळी केला.