तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही टीव्हीके पक्षाला अद्याप सरकार स्थापन करता आलेले नाही. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय जोसेफ यांना 118 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर करण्यास सांगितली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआय(एम) या पक्षांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलेला असला, तरी अद्याप व्हीकेसी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (यांच्या पाठिंब्याच्या अधिकृत पत्रे राज्यपालांपर्यंत पोहोचलेली नाहीत. त्यामुळे विजय जोसेफ यांचा मुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथविधी सोहळा होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विजय यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन 116 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र सादर केले. तसेच, व्हीकेसी आणि आययूएमएलकडून औपचारिक पत्रे लवकरच सादर केली जातील, अशी माहिती राज्यपालांना देण्यात आली. दरम्यान उरलेली पाठिंब्याची पत्रे मिळाल्यांतर राज्यपाल कार्यालय शपथविधी सोहळ्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या पाच आमदार आणि सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके व आययूएमएलच्या प्रत्येकी दोन आमदारांच्या पाठिंब्याने, टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील आघाडीचा आकडा 120 जागांपर्यंत पोहोचेल आणि शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विजय मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी अपेक्षा होती; परंतु व्हीसीकेचे पत्र अद्याप पोहोचले नसल्याने काही अनिश्चितता कायम आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सत्तास्थापनेचा मार्ग खुला करण्यासाठी टीव्हीकेला यापूर्वीच काँग्रेसच्या 5 आमदारांसह सीपीआय, सीपीआय(एम)च्या प्रत्येकी 2 आमदारांचा पाठिंबा मिळाला होता.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी हे विजय जोसेफ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.