Home Featured पश्चिम बंगालमध्ये आज शपथविधी

पश्चिम बंगालमध्ये आज शपथविधी

0

भाजपकडून शुभेंदू अधिकारींची विधिमंडळ नेतेपदी निवड; शपथविधी सोहळ्याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार

पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयाचे शिल्पकार शुभेंदू अधिकारी हे आज (दि. 9) राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. अधिकारी यांनी लोकभवन येथे राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. शनिवारी सकाळी 11 वाजता कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
4 मे रोजी जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतर भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 207 जागांवर विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत करणारे शुभेंदू अधिकारी हे आता नवे मुख्यमंत्री होणार आहेत. पश्चिम बंगाल भाजपने त्यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी केली. पश्चिम बंगालच्या सत्ता स्थापनेचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल कोलकाता येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत शुभेंदू अधिकारी यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

कोलकाता येथील बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाजपच्या पश्चिम बंगाल कार्यकारिणी आणि नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य उपस्थित होते. या बैठकीत शुभेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

कोण आहेत शुभेंदू अधिकारी?
शुभेंदू अधिकारी यांना एक प्रतिष्ठिती राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए-2 सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिले होते. शिशिर यांना शुभेंदू, दिब्येंदू आणि सौमेंदू अशी तीन मुले आहेत. तिघेही राजकारणात सक्रिय आहेत.

ममता बॅनर्जींचा दोन वेळा केला पराभव
55 वर्षीय शुभेंदू अधिकारी यांनी 2021 साली नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर पाच वर्ष त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा तब्बल 15 हजार मतांनी दणदणीत पराभव केला.

शुभेंदू अधिकारी यांचा
राजकीय प्रवास

शुभेंदू अधिकारी यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून राजकीय जीवनाचा प्रवास सुरू केला. शुभेंदू अधिकारी जेव्हा राजकारणात आले तेव्हा बंगालमध्ये डाव्यांची सत्ता होती. 1995 साली ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 1998 साली जेव्हा ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा ते त्या पक्षात आले. 2006 मध्ये ते कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. एका वर्षानंतर, ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम आणि सिंगूरमधील जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनादरम्यान त्यांना मुख्य संघटक बनवण्यात आले. अधिकारी यांनी ‘भूमी उच्छेद प्रतिरोध समिती’चे नेतृत्व करत नंदीग्राममधील आंदोलनाचे सारथ्य केले. या आंदोलनाने बंगालमधील डाव्या आघाडीची 34 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आणि 2011 मध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्या.

ममतांची साथ सोडली
एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सहकारी असलेले शुभेंदू अधिकारी 2020 साली भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांनी पक्षाचे नेतृत्व करत भाजपचे पहिल्यांदाच 77 आमदार निवडून आणण्याची किमया करून दाखवली होती.

अमित शहा काय म्हणाले?
निवडणुका संपल्या असून पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आता सर्वांनी एकच नाव पुढे केले आहे. दुसरे नाव निवडण्यासाठी नेत्यांना वेळ देण्यात आली, मात्र दुसऱ्या कुणाचेही नाव पुढे आले नाही. यामुळे आता शुभेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे या बैठकीत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.