गरज पर्यावरणीय गणेशोत्सवाची

0
80
  • राजेंद्र पां. केरकर

या सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही गणेशोत्सव साजरा केला तर तो केवळ आमच्या कुटुंबासाठीच नव्हे तर परिसरासाठी आनंदवर्धक ठरेल. पर्यावरणीय मूल्यांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला तर सुखकर्त्याची खरी कृपा आपल्यावर होईल.

गणपती ही देवता कला, संस्कृती, बुद्धीशी निगडीत म्हणून पुजली जात असून, गजमुखी असणारी ही देवता म्हणजे नानातत्त्वे, नाना संचिते यांचा संगम आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला ऊर्जा मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्याची परंपरा महाराष्ट्रात १२३ वर्षांपूर्वी निर्माण केली. परंतु आज कौटुंबिक आणि सार्वजनिक स्तरावर हा उत्सव साजरा करत असताना लोकमान्य टिळकांचा उद्देश लुप्त झालेला असून बर्‍याच ठिकाणी या उत्सवामुळे हवा, ध्वनी आणि जलप्रदूषणाची समस्या अक्षरशः नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. उत्सव म्हणजे सौहार्दता, शिस्त, सौजन्य यांचे जणू काही विस्मरण समाजाला होत असून, आज त्याची जागा प्रकर्षाने धांगडधिंगा, ध्वनिप्रदूषण, केरकचर्‍याची समस्या, प्रदूषित पाणी आदी समस्यांनी घेतलेली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील पर्यावरण, परिसंस्था, वन्यजीव यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वावरणे गरजेचे असताना, आज आपले सण, उत्सव प्रदूषणकारी आणि विनाकारण मनःस्ताप देण्यास कारणीभूत ठरू लागले आहेत. खरं तर गणपती म्हणजे जंगलातल्या सस्तन प्राण्यांपैकी महाकाय आणि बुद्धिमान म्हणून ओळखल्या जाणार्‍या हत्तीचेच रूप. या गजमुखी देवतेसाठी आपण मखर सजावटीपासून माटोळी बांधण्यापर्यंत तसेच उजेडाची व्यवस्था करताना जी उधळपट्टी करत आहोत त्याच्यावर धार्मिक स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीच्या नावाखाली निर्बंध घालण्यास धजत नाही. त्यामुळे आपण कौटुंबिक असो अथवा सार्वजनिक स्तरावर- या उत्सवाच्या सादरीकरणाला पर्यावरण मूल्यांची जोड देणे आजच्या काळाची गरज बनलेली आहे.

आपल्या पूर्वजांनी जी सण-उत्सवांची परंपरा निर्माण केली त्यामागे निसर्गाचे जतन, आरोग्याची काळजी, मनाचे संतुलन टिकावे असे प्रयोजन असले पाहिजे. परंतु आज ज्या पद्धतीने आम्ही हे सण-उत्सव साजरे करतो त्यातून निसर्गातल्या कित्येक घटकांचा जसा र्‍हास होतो तसेच आरोग्याचा गुंता बिकट होतो आणि मानसिक शांतीही भंग पावते. त्यामुळे गणेशोत्सवासारख्या उत्सवाचे स्वरूप पर्यावरणीय मूल्यांद्वारे होईल यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. गणपती हा केवळ पर्वत धारण करणार्‍या वसुंधरेचा म्हणजेच पार्वतीचा पुत्र असल्याने त्याची पूजा मृण्मयी मूर्तीच्या रूपात केली जाते. शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणपतीच्या मूर्तीला उपलब्ध असलेल्या निसर्गातल्या जलरंगांनी रंगवले जायचे आणि त्यामुळे अशा गणपतीचे जलस्रोतांत विसर्जन केले तर विशेष प्रदूषण होत नसे. शाडूच्या मूर्ती वजनदार आणि किंमत जादा असल्याने गोव्यात काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची कायद्याने विक्री करणे बंदी असताना लोक घरी नेऊन उत्सवप्रसंगी पूजा करतात. अशा मूर्ती पाण्यात सहजासहजी विरत नसल्याने भरतीला किनार्‍यावर वाहून आलेल्या किंवा जलस्रोतातले पाणी आटल्यावर उघड्या पडलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. बर्‍याचदा जलस्रोतांच्या उगमावर घट्ट बसल्याने पाण्याचा प्रवाहही खंडित होण्याचे प्रकार उद्भवतात. पाण्यातल्या सेंद्रीय पदार्थांच्या विघटनावरही दुष्परिणाम होत असतात. आज गोव्यात केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच नव्हे तर शाडूच्या मूर्तीही रंगवताना रासायनिक रंगांचा वापर केला जातो. अशा रंगामध्ये शिसे आणि तत्सम घातक रासायनिक घटक असल्याने त्यांचा संयोग पाण्याशी होऊन हे पाणी पिण्यास आणि आंघोळ करण्यास घातक होते. तळ्यात अमोनिया, हायड्रोजन सल्फाइडसारख्या वायूंची निर्मिती होऊन हा परिसर असह्यकारक होतो आणि त्यातल्या जीवांवरही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची पाळी येते.

गणपती विसर्जनावेळी पाने, फुले आदींचे निर्माल्य जलस्रोतांत टाकण्याऐवजी आपल्या लागवडीसाठी, वृक्षवेलींना सेंद्रीय खत म्हणून वापरणे फायदेशीर ठरलेले आहे. गणपती पूजेसाठी पूर्वी भाविक आपल्याच परसबागेतल्या जास्वंदी, अनंत, गुलाब, सोनचाफा आदी फुलांचा प्रामुख्याने वापर करीत असत. आज ताजी फुले पहाटे काढणे त्रासदायक समजत असल्याने किंवा परसबागा इतिहासजमा झाल्याने बाजारात मिळणारी रंगीबेरंगी आणि आकर्षक प्लास्टिक फुले वापरण्यात लोकांना सोईस्कर वाटू लागलेले आहे. अशी फुले उत्सव झाल्यावर काहीजण पाण्यात फेकून देतात आणि त्याचे दुष्परिणाम जलस्रोतांवर होतात. आज बाजारपेठेत थर्माकोल व तत्सम अविघटनशील पदार्थांपासून तयार केलेली लक्षवेधक मखरे विक्रीला असतात. ती खरेदी करून त्यांचा वापर उत्सवात मोठ्या प्रमाणात केला जातो. आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की थर्माकोल फक्त अविघटनशीलच नव्हे तर ते ज्वालाग्राही असल्याने त्याचा पर्यावरणाला धोका असतो. आपल्या गोव्यात केळीच्या गब्यापासून कल्पकरीतीने मखर निर्माण करण्याचे कला-कौशल्य होते. केळीचे गबे, झाडांच्या साली, पाने-फुले, कागदाचे पुठ्ठे यांचा वापर करून आपण खूप सुरेख मखर सजावट करू शकतो आणि उत्सव झाल्यावर त्याचा उपयोग सेंद्रीय खत म्हणून करता येतो.

गोवा-कोकणात गणपतीच्या माथ्यावर मौसमी फुले-फळे, वृक्ष-वेली यांचा वापर माटोळी सजविण्यासाठी करण्याची परंपरा आहे. माट्टूला, घागर्‍या, कवंडळा, माकडलिंबू, कार्वी, आम्रपल्लव, पुंगीफळे, जायफळ, टेटू, मेडशिंग, बोणकळो… असे निसर्गात उपलब्ध असलेेले असंख्य घटक गणपतीची माटोळी सजविण्यासाठी वापरण्यामागे कोणती वनस्पती औषधी, कोणती विषारी, कोणती फुले-फळे, कंदमुळे देणारी यांचे ज्ञान एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला देणे हे प्रयोजन होते. आज ऍलोपॅथिक औषधांच्या वावटळीत भारतीय लोकमानसाने पारंपरिक वनौषधी आणि निसर्गावर आधारित उपचारपद्धतीकडे दुर्लक्ष केल्याने हा वारसा विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहे. बाजारात माटोळीचे सारे सामान उपलब्ध असल्याने जंगलात जाऊन वृक्षवेली, मौसमी फुले-फळे यांचे ज्ञान आकलन करून घेण्याची तसदी अभावानेच घेतली जाते.

गणपतीच्या सजावटीसाठी बेसुमार विजेचा वापर करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने अशा दिव्यांच्या झगझगाटामुळे विजेचा गैरवापर आणि उधळपट्टी केली जाते याचे भान आपणाला नसते. उत्सवाप्रीत्यर्थ ध्वनिक्षेपकाचा वापर, ध्वनिप्रदूषणाचा अतिरेकी वापर करणारे संगीत यामुळे हृदयविकार, मधुमेहच नव्हे तर अन्य आजारी रुग्णांना या दिवसांत मनःस्तापाला समोरे जावे लागत असते. गणपतीची पूजा, विसर्जनात दारूकामाची वारेमाप आतषबाजी हे प्रतिष्ठेचे लक्षण असल्याने त्यामुळे आपल्या कृत्याद्वारे हवा, ध्वनी, जलप्रदूषणाला आपण आमंत्रण देतो याचे विस्मरण लोकांना होत असते. उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी केली जाते. या सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही गणेशोत्सव साजरा केला तर तो केवळ आमच्या कुटुंबासाठीच नव्हे तर परिसरासाठी आनंदवर्धक ठरेल. पर्यावरणीय मूल्यांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला तर सुखकर्त्याची खरी कृपा आपल्यावर होईल.