विकासपुरुष

0
183

भारतीय राजकारणाचे उन्हाळे, पावसाळे, हिवाळे जवळून अनुभवलेल्या प्रणव मुखर्जी यांची जीवनज्योत अखेर निमाली आहे. एक संघर्षमय आयुष्य काळाच्या पडद्याआड गेेले. पाच दशकांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी या देशाला जे चौफेर योगदान दिले आहे, ते निव्वळ अमूल्य आहे. अर्थ, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, वाणिज्य अशा विविध क्षेत्रांची मंत्रिपदे आणि मंत्रिगटांची अध्यक्षपदे भूषविताना त्यांनी या देशाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलला. इंदिरा गांधींपासून डॉ. मनमोहनसिंगांपर्यंत सदोदित निष्ठापूर्वक देशाची सेवा करीत आलेला हा विकासपुरुष आता आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाही. भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून वावरताना आपल्या निष्पक्ष नीतीने त्या पदाची शान उंचावणारे प्रणवदा देशाचीही शान होते. जे मोजकेच विद्वान, विचारवंत नेते देशाला लाभले त्यामध्ये प्रणव मुखर्जी यांचा आवर्जून समावेश करावा लागतो. पी. व्ही. नरसिंहरावांएवढे प्रकांडपांडित्य भले त्यांच्यापाशी नसेल, परंतु राजकारणासारख्या क्षेत्रामध्ये वावरतानासुद्धा एका उच्च वैचारिक पातळीवरून वावरता येते हे त्यांनी दाखवून दिले.
आपल्या राजकीय जीवनामध्ये त्यांना अनेकदा संघर्ष करावा लागला. अनेक वादळे झेलावी लागली. इंदिरा गांधींच्या काळापासून ते राष्ट्रीय राजकारणात राहिले, परंतु वेळोवेळी हातातोंडाशी आलेला पंतप्रधानपदाचा घास मात्र त्यांच्याकडून ऐनवेळी काढून घेतला गेला. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर खरे तर मंत्रिमंडळातील ज्येष्ठताक्रमानुसार पंतप्रधानपद त्यांच्याकडे चालून यायला हवे होते, परंतु राजीव सहानुभूतीच्या लाटेत प्रणवदांचे पंतप्रधानपद वाहून गेले. राजीव गांधींच्या मनामध्ये त्यांच्याप्रती कटुता निर्माण करण्यात आली. इतकी की, प्रणवदांना पक्ष सोडावा लागला व स्वतःची राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस स्थापावी लागली. पुढे गांधी घराण्याशी त्यांची पुन्हा दिलजमाई झाली, परंतु तरीही वेळोवेळी त्यांचे पंतप्रधानपद मात्र डावलले गेले. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ज्येष्ठतेनुसार त्यांच्याकडे पंतप्रधानपद जायला हवे होते, परंतु ते अननुभवी मनमोहनसिंग यांना दिले गेले. २००९ मध्ये मनमोहनसिंगांवर ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली, तेव्हा पंतप्रधानपद आपल्याला मिळेल असे त्यांना वाटले, परंतु तेव्हाही ते पद हिरावले गेले. २०१२ च्या निवडणुकीवेळी मनमोहनसिंगांना राष्ट्रपतीपद दिले जाईल व आपला पंतप्रधानपदासाठी विचार होईल असे त्यांना वाटत होते, परंतु तेव्हाही त्यांच्या तोंडचा तो घास काढून त्यांना राष्ट्रपतीपदावर पाठवण्यात आले. आपली ही खंत प्रणवदांनी आपल्या पुस्तकामध्ये प्रांजळपणे व्यक्त केलेली आहे. तीन कारणांमुळे आपले पंतप्रधानपद हिरावले गेले असे त्यात त्यांनी लिहिले आहे. आपण बहुतेकदा लोकसभेवर नव्हे, तर राज्यसभेवर निवडला जात होतो, आपल्याला हिंदी येत नाही व सत्तरच्या दशकापासून राष्ट्रीय राजकारणात राहूनही आपल्याला पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेसची सत्ता आणता आली नाही ह्या तीन गोष्टी आपल्या विरोधात गेल्याचे त्यांनी त्यात नमूद केलेले आहे. कारण काही असो, प्रणवदांच्या हातातोंडाशी आलेला पंतप्रधानपदाचा घास वेळोवेळी हिरावला गेला हे मात्र खरे.
आयुष्यभर कॉंग्रेसी विचारधारेशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रवणदा आयुष्याच्या उत्तरार्धात राष्ट्रपदीपदी आले तेव्हा मोदी यांच्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या आक्रमक नेत्याचे लखलखीत बहुमताचे सरकार सत्तेवर होते, परंतु राष्ट्रपतीपदाची शान कोठेही घालवली जाणार नाही हे प्रणवदांनी पाहिले हे त्यांचे मोठेपण आहे. मोदींच्या चांगल्या कार्याचे त्यांनी कौतुकच केले, परंतु आपल्या विचारांशीही ते ठाम राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना नागपूरच्या संघ शिक्षा वर्गात पाहुणे म्हणून बोलावले तेव्हा कोण वादळ उठवले गेले, परंतु तेथेही प्रणवदांनी भारताची विविधता, एकात्मता, उदारता, सहिष्णुता यांचाच निःसंदिग्ध गजर केला. ‘विविध विचारधारांच्या संयोगातून बनलेली विशाल राष्ट्रीय दृष्टी’च हा देश चालवण्यासाठी गरजेची आहे ही त्यांची धारणा होती. असा हा मूल्यनिष्ठ, विवेकी, शालीन नेता आता आपल्यात नाही. देशाचे हे नक्कीच फार मोठे नुकसान आहे.