देशाने एक अनुभवी, प्रगल्भ नेता गमावला

0
148

>> गोव्यासह देशात सात दिवसांचा दुखवटा

माजी राष्ट्रपती आणि देशातील एक आदरणीय ज्येष्ठ राजकीय नेते श्री. प्रणव मुखर्जी यांचे काल वयाच्या ८४ व्या वर्षी देहावसान झाले. श्री. मुखर्जी यांच्या मेंदूवर या महिन्यात १० ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया झाली होती. इस्पितळात भरती करताना त्यांना कोरोना असल्याचेही स्पष्ट झाले होते. गेले अनेक दिवस ते कोमामध्ये होते. श्री. मुखर्जी यांच्या निधनामुळे गोव्यासह देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

‘‘जड अंतःकरणाने आपल्याला कळवावे लागत आहे की माझे वडील श्री. प्रणव मुखर्जी यांचे आरआर इस्पितळातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न केलेले असताना व देशभरातील लोकांच्या दुआ आणि प्रार्थना असूनही नुकतेच निधन झाले आहे’’असे त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी ट्वीट केले.

श्री. मुखर्जी यांची प्रकृती काल सकाळी खालावल्याचे ते भरती असलेल्या दिल्लीच्या लष्करी इस्पितळाने जाहीर केले होते. मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर कोरोनाने फुफ्फुसाच्या विकाराची भर पडताच त्यांना लष्कराच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
‘देशाला न मिळालेला सर्वोत्तम पंतप्रधान’ असे प्रणव मुखर्जी यांचे वर्णन केले जात असे, कारण त्यांना सर्वतोपरी पात्र असूनही पंतप्रधानपद कधीच प्राप्त झाले नाही. सर्व राजकीय पक्षांना त्यांच्याप्रती आदर होता.

देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री अशी मोठमोठी पदे भूषविल्यानंतर शेवटी त्यांना राष्ट्रपतीपदावर समाधान मानावे लागले होते. सन २०१२ ते २०१७ या काळात ते राष्ट्रपतीपदी होते. गेल्या वर्षीच त्यांना ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित करण्यात आले होते.

पाच दशकांची राजकीय कारकीर्द
प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द जवळजवळ पाच दशकांची होती. पश्‍चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील मिराती गावी कामदाकिंकर मुखर्जी व पत्नी राजलक्ष्मी या स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबात ११ डिसेंबर १९३५ रोजी जन्मलेले प्रणवदा सुरवातीला प्राध्यापक व पत्रकार होते. ६९ पासून ते राजकारणात सक्रिय झाले.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, जहाजबांधणी, वाहतूक, पोलाद आदी खात्यांचे उपमंत्री राहिल्यानंतर १९७३-७४ मध्ये ते अर्थराज्यमंत्री बनले. ८२ साली ते प्रथमच देशाचे अर्थमंत्री बनले. राज्यसभेचे नेते, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, वाणिज्य मंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री, संरक्षणमंत्री अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी वेळोवेळी योगदान दिले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई विकास बँक आदी आंतरराष्ट्रीय संस्थांवरही त्यांनी योगदान दिले.

सन २००९ ते २०१२ या काळात ते देशाचे अर्थमंत्री होते. तत्पूर्वी सन २००४ ते २००६ या काळात ते संरक्षणमंत्री, तर २००६ ते २००९ या काळात ते परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. देशाचे तेरावे राष्ट्रपती म्हणून त्यांनी २५ जुलै २०१२ रोजी कार्यभार स्वीकारला. राष्ट्रपती बनण्यापूर्वी ते अखिल भारतीय कॉंग्रेस कार्यसमितीचे तब्बल २३ वर्षे सदस्य होते. प्रख्यात रवींद्रसंगीत गायिका सुव्रा मुखर्जी या त्यांच्या पत्नी होत्या. त्यांना दोन पुत्र व शर्मिष्ठा ही एक कन्या आहे.

देशाच्या विकासात अमूल्य योगदान
प्रशासकीय सुधारणा, माहिती अधिकार कायदा, रोजगार हमी कायदा, अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार, आधारसाठी ‘यूआयडीएआय’ ची स्थापना, मेट्रो रेल्वे, अशा अनेक क्रांतिकारी पावलांचे श्रेय त्यांना जाते. जवळजवळ ९५ मंत्रिमंडळ समित्यांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना, राष्ट्रीय कृषी बँकेची स्थापना आदींमध्येही त्यांचे मौलिक योगदान होते. केंद्र आणि राज्य सरकारादरम्यान महसुल वाटपाच्या सुप्रसिद्ध गाडगीळ – ‘मुखर्जी’ फॉर्म्युल्यात त्यांचे योगदान होते. आंतरराष्ट्रीय संबंध, देशाचे आर्थिक व्यवहार यांचे ते मोठे जाणकार होते. विविध पेचप्रसंगांमध्ये त्यांनी संकटमोचकाची भूमिका बजावली.