बटलर, आर्चर, वूडचे पुनरागमन

0
95

>> ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

जोस बटलर, मार्क वूड व जोफ्रा आर्चर यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-ट्वेंटी व वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. कसोटी कर्णधार ज्यो रुट याच्यासाठी मात्र टी-ट्वेंटीचे दार उघडण्यात आलेले नाही तर दुखापतीमुळे जेसन रॉय याचा विचार करण्यात आलेला नाही. २०१६ साली भारतातील टी-ट्वेंटी विश्‍वचषकात इंग्लंडला अंतिम फेरीपर्यंत नेण्यास रुट याने मोलाचे योगदान दिले होते. संघाच्या टी-ट्वेंटी योजनेत समाविष्ट होण्याची इच्छा देखील त्याने व्यक्त केली होती. यॉर्कशायरकडून खेळताना टी-ट्वेंटी ब्लास्टमध्ये डर्बिशायरविरुद्ध फलंदाजी तसेच गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करत रुट याने निवड समितीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न देखील केला.

परंतु, तूर्तास त्याला संघात जागा नसल्याचे इंग्लंडच्या निवड समितीचे अध्यक्ष एड स्मिथ यांनी सांगितले आहे. ज्यो रुट याला स्थान न देण्यामागचे कारण स्पष्ट करताना स्मिथ म्हणाले की, रुट हा इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. इंग्लंडच्या वनडे क्रिकेटमधील संघाचा तो आधारस्तंभ आहे. त्याच्यावर प्रचंड दबाव आहे. इंग्लंडच्या टी-ट्वेंटी संघाची रचना पाहिल्यास रुट याला सामावून घेणे सध्या तरी शक्य नसले तरी त्याला टी-ट्वेंटी संघाचे दार कायमचे बंद झाले नसल्याचे संकेतही त्यांनी दिले. सॅम करन संघात परतला असून प्रभावी कामगिरीच्या बळावर टॉम बँटन याने दोन्ही संघात स्थान प्राप्त केले आहे. वूड व आर्चर परतल्यामुळे साकिब महमूदला मुख्य संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत ८ बळी व फलंदाजीत ९७ धावा करूनही अष्टपैलू डेव्हिड विली संघात स्थान मिळवू शकलेला नाही. इंग्लंडचा संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४, ६ व ८ सप्टेंबर रोजी टी-ट्वेंटी तर ११, १३ व १६ सप्टेंबर रोजी वनडे सामने खेळणार आहे.

इंग्लंड टी-ट्वेंटी संघ ः ऑईन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बॅअरस्टोव, टॉम बँटन, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ज्यो डेन्ली, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, आदिल रशीद व मार्क वूड, राखीव ः लियाम लिव्हिंगस्टोन व साकिब महमूद
इंग्लंड वनडे संघ ः ऑईन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बॅअरस्टोव, टॉम बँटन, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद, ज्यो रुट, ख्रिस वोक्स, मार्क वूड, राखीवः ज्यो डेन्ली व साकिब महमूद