वास्कोत अज्ञातांकडून सासू-सुनेचा खून

0
129
मायमोळे येथे ज्या इमारतीत खून झाले ती इमारत व बाजूस पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग व अन्य. (छाया : प्रदिप नाईक)

फ्लॅटमध्ये घुसून झोपेतच गळा आवळला : ऐवजही पळविला
मायमोळे-वास्को येथील कामत पॅलेस इमारतीतील एका फ्लॅटमध्ये शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरटे घुसून त्यांनी झोपेत असलेल्या सासू-सुनेला ठार करून किंमती ऐवज पळविला. ठार झालेल्या सासूचे नाव श्रीमती उषा नामदेव नाईक (वय ५८) व सुनेचे नाव डॉ. नेहा सिध्दार्थ नाईक (२६) असे आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.सुदैवाने श्रीमती उषा नाईक यांची धाकटी सून प्रतिमा प्रवीण नाईक (२५) व त्यांची ६ महिन्यांची मुलगी बचावली. उषा नाईक यांचे दोन मुलगे विदेशात नोकरीला आहेत.
याबाबत वृत्त असे, मायमोळे येथील श्री कामत पॅलेस इमारतीतील एका फ्लॅटमध्ये राहतात. श्रीमती उषा नाईकच्या नवर्‍याचे दोन वर्षापूर्वी निधन झाले होते.
काल गुरुवारी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास दोघे अज्ञात तरूण गॅस स्टोव्ह दुरुस्त करण्यासाठी वरील फ्लॅटमध्ये गेले होते. त्यांनीच हे कृत्ये केले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्या अज्ञात तरूणांनीच फ्लॅटची सर्व माहिती प्राप्त करून मध्यरात्रीच्यावेळी फ्लॅटमध्ये घुसून सासू सुनेचा खून करून किंमती ऐवज घेऊन पलायन केल्याचे अंदाज वर्तविण्यात येत असला तरी बचावलेल्या सौ. प्रतिमा प्रविण नाईक यांच्या जबानीवर आता सर्व काही अवलंबून आहे.
सदर खूनाची माहिती पोलीसांना पहाटे ४.३५ वाजता मिळाल्यावर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. वास्को पोलीस स्थानकाचा अतिरिक्त ताबा सांभाळणारे निरीक्षक शैलेश नार्वेकर, पोलीस उपअधिक्षक लॉरेन्स डिसोझा, वेर्णाचे पोलीस उदय परब, मडगांवचे निरीक्षक राम आसारे हे घटनास्थळी दाखल झाले. श्‍वान पथक आणि ठसे तज्ञांनी घेऊन आवश्यक पुरावे गोळा केले, दरम्यान, श्‍वान पथक घटना स्थळापासून ५० मीटर पर्यंत जाऊन आले. पण पुढे गेले नाही. या फ्लॅटमध्ये खालच्या बेडरूमध्ये दोन्ही सुना झोपल्या होत्या. कदाचित गुरूवारी संध्याकाळी गॅस स्टोव्ह दुरुस्तीचे कारण सांगून फ्लॅटमध्ये आलेल्या त्या दोघा अज्ञातानी दरवाजाची चावी घेऊन पळ काढला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यांनीच मध्यरात्रीच्या सुमारास फ्लॅटमध्ये घुसून वरील कृत्य केले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.
सर्व प्रथम फ्लॅटमध्ये घुसताच दिवाणखान्यात झोपलेल्या श्रीमती उषा नाईक यांचा झोपेतच गळा आवळला गेला व श्‍वासोच्छवास कोंडून खून केल्याचे तपासात दिसून आले आहे. डॉ. नेहा यांनाही तशाच पध्दतीने मारण्यात आले. डॉ. नेहा यांची किंकाळी ऐकून सौ. प्रतिमा उठून बाहेर आल्या असता तिच्या डोक्यावर जडवस्तूने प्रहार करून तिचाही गळा आवळला. पण काही क्षण बेशूध्द पडून नंतर त्यांना शुध्दी आल्याचे पोलिसांनी सांगितले. खून करण्यात आल्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटे खोलून दागिने वगैरे नेले असे पोलिसांचे म्हणणे आहे.
खून झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यानंतर लोकांची एकच गर्दी उसळली श्री कामत पॅलेस इमारतीत देखरेखीसाठी वॉचमॅनची व्यवस्था नसल्याचेही आढळून आले आहे. पाच वर्षांपूर्वी याच इमारतीत दिवसा ढवळ्या याच इमारतीत दिवसा ढवळ्या एका स्कूटरच्या डिकीमधील २५ हजार रोख लूटण्याचा प्रकार घडला होता. डॉ. नेहा ह्या होमिओपथी डॉक्टर होत्या. त्यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. ते एप्रिलमध्ये परतणार होते त्याचे पती सिध्दार्थ डिसेंबरच्या पहिल्या जहाजावर गेले होते. ते एप्रिलमध्ये परतणार होते, असे चौकशी अंती कळले.
नाईक कुटुंबावर झालेल्या या अपघामुळे वास्कोत घबराटीचे वातावरण पसरलें आहे. दरम्यान पोलिसांनी अनोळखी व्यक्तीना फ्लॅटमध्ये तसेच घरात येण्यापासून परावृत्त करावे असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
वास्को पोलीस स्थानकाचे हंगामी निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साळूंखे, निखिल पालेकर व इतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. खूनी लवकरच हाती लागणार असल्याचा कयास पोलीसांनी वर्तविला आहे.