कॉंग्रेसवर ‘जयंती बॉम्ब’

0
92

सोनिया-राहूलवर सनसनाटी आरोपांसह पक्षत्याग
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीमुळे तेथील राजकीय हवामान तापले असतानाच कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या युपीए सरकारात पर्यावरणमंत्री राहिलेल्या जयंती नटराजन यांनी काल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करीत कॉंग्रेसचा त्याग करीत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र कॉंग्रेसने नटराजन यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. कॉंग्रेस आता पूर्वीसारखा राहिलेला नसल्याचा आरोपही नटराजन यांनी केला आहे.आपण केंद्रातील युपीए सरकारात पर्यावरणमंत्री असताना कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांचा आपल्यावर दबाव होता. अनेक प्रकल्प राहूल गांधी यांच्यामुळे रोखून ठेवावे लागले असा खळबळजनक आरोप नटराजन यांनी केला आहे. त्यांनी अशा प्रकारे कॉंग्रेसमधील सोनिया-राहूल राजवटीविरोधात सरळ बंड करीत पक्षत्याग केला आहे. राहूल गांधी यानाच लक्ष्य करीत त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे कैफियत करणारे पत्र गेल्या नोव्हेंबरमध्ये पाठविले होते. ते पत्र आता जाहीर करण्यात आले असून ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेसची बरीच कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कॉंग्रेसने आरोप फेटाळले
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते पी. सी. चाको यांनी नटराजन यांचे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. जो कोणी पक्षत्याग करू इच्छितो त्याला तशी मोकळीक आहे असे ते म्हणाले.
‘स्नूपगेट’ कॉंग्रेसचाच डाव
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी जयंती नटराजन यांना लक्ष्य केले होते. ‘जयंती टॅक्स’मुळे पर्यावरण मंत्रालयात फायली अडकत होत्या असा मोदींचा आरोप होता. मात्र आता नटराजन यांनी जो बॉम्बगोळा टाकला आहे त्याचा लाभ आता मोदी व पार्यायाने भाजपाला होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मोदी यांना ‘स्नूपगेट’मध्ये अडकवण्याचे कारस्थान कॉंग्रेसचेच होते असे आता जाहीर झालेल्या नटराजन यांच्या पत्रात म्हटले आहे. नटराजन यांनी ३५ मोठे प्रकल्प अडवून ठेवल्याचा आरोप होता. हे प्रकल्प पाच हजार कोटी रुपयांचे होते. नटराजन यांनी नरसिंहराव पंतप्रधान असताना कॉंग्रेस सोडून जी. के. मुसनार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तामिळ मनिला -कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.