‘‘जीवदान’’

0
110

– शेखर वासुदेव खांडेपारकर
आज रविवारची सुट्टी असल्याने पणजीच्या सिनेमागृहात जाऊन ‘क्लासमेटस्’ नावाचा लागलेला चांगला मराठी चित्रपट पाहावा, असं रोहित आणि त्याचा जीवलग मित्र दीपक या दोघांनी आदल्या दिवशी ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे रोहितने रविवारचे दुपारचे जेवण लवकर उरकून घेतले. त्यानुसार तो तयार होऊन दीपकची मार्गप्रतीक्षा करीत आपल्या घरी येरझार्‍या घालू लागला. घड्याळात दुपारचे तीनचे ठोके वाजले तरी दीपकचा काही पत्ता नव्हता. तसेच तो आता येण्याची शक्यता कमी होती. या सर्वामुळे रोहित मनोमनी फार हताश होऊन आपल्या खोलीत जाऊन बसला. यावेळी रोहितचा रागाचा पारा हा अधिक होता. दीपक हा त्याचा मित्र होता म्हणून बरं, त्याच्याजागी जर दुसरा कोणी असता तर मात्र, त्याची खैर नव्हती. रोहित तसा अजून कोणाच्या प्रेमात पडला नव्हता. मात्र यापुढे तो कोणाच्या प्रेमात पडेल की नाही हे सांगता येणार नव्हते. रोहितचे सर्व मित्र प्रेमात पडले होते. मात्र, रोहित हा प्रेमापासून चार हात लांबच होता. त्याला प्रेमाची भाषा कळत होती. पण फुलपाखरू होऊन मध खाण्यास तो इच्छुक नव्हता. रोहित देखणा असल्याने अनेक मुली त्याच्यावर प्रेम करायच्या. मात्र, रोहित या सर्वांकडे दुर्लक्षच करायचा. कारण रोहितला आपल्या मोठ्या बहिणीची काळजी वाटत होती. तिनं लग्न केल्याशिवाय आपण लग्न करणार नाही असा त्याने चंगच बांधला होता.
रोहित हा शांत स्वभावाचा, प्रामाणिक वृत्तीचा होता. मात्र, तो तेवढाच रागीट स्वभावाचा होता. त्याला चटकन राग येत असे. मात्र, आज त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले होते. दीपक गरीब असला तरी तो फसवेगिरी करणारा नव्हता हे त्याला ठाऊक होते. त्यामुळेच त्याने आपल्या रागावर संयम ठेवला होता. दीपक का आला नाही याचाच विचार करत बसला होता. त्यावर असं कोणत संकट ओढवलं असेल म्हणून तो आला नाही, याचाच विचार करत होता. विचार करता करता रात्रीचे नऊ कधी वाजले हे रोहितला कळलेच नाही. नऊ वाजले तरी रोहित जेवायला का आला नाही… म्हणून त्याच्या आईने बहीण आर्याला त्याला बोलावण्यासाठी त्याच्या खोलीत पाठविले. रोहितला चिंताग्रस्त असल्याचे पाहून आर्याने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहितने रात्रीचे जेवण घेण्याचे टाळले. बहीण आर्याकडून रोहितने प्यायला पाणी घेतले. पाणी पिऊन तो शांत झोपी गेला.
दुसर्‍या दिवशी सूर्याची किरणे सर्वत्र पसरली होती. रोहितने सकाळी ऊठून आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून कामावर जाण्याच्या तयारीत असताना, दीपक अचानक त्यांच्या दारात उभा राहिला. त्याला पाहताच रोहितचे डोळे निखार्‍यासारखे लाल-भडक झाले होते. मात्र, दीपक स्वत: त्याच्या समोर उभा असल्याने त्याचा राग क्षणात निवळला. रोहितने शांतपणे विचारले, ‘अरे, काल तू सिनेमा पाहण्यासाठी का आला नाहीस? तू न आल्याने मी फार चिंताग्रस्त होतो’.
‘मित्रा, मला माहीत आहे की, माझ्या न येण्याने तू फार दु:खी झाला आहेस. चल मी तुला जाता जाता सर्व काही सांगतो. मित्रा पहिल्यांदा मी तुझी क्षमा मागतो. कारण मी तुला न सांगताच एका मुलीवर प्रेम केलं आहे’. हे ऐकल्यावर रोहित म्हणाला की, ‘अरे मित्रा, मी तुझ्यावर सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम करून तुझ्यावर विश्‍वास ठेवला. मात्र, तू आपल्या प्रेमाविषयी मला काहीच सांगितले नाहीस. अरे प्रत्येक तरुण-तरुणींना प्रेम करण्याचा हक्क आहे. मात्र, प्रेमात पाऊल टाकताना आपण कुठे चुकत तर नाही ना? त्याचा प्रथम सारासार विचार करावा लागतो. अरे प्रेम आंधळे असले तरी संसार हा आंधळा नसतो’, रोहित शांतपणे उद्गारला. यावेळी दीपक म्हणाला, ‘अरे मित्रा, मला सांगायला फार वाईट वाटते आहे की, माझे प्रेम तूला आवडणार नाही’.
‘तू सांगून तर बघ!’
रोहित म्हणाला, ‘मित्रा मी ज्या मुलीवर प्रेम करतो, ती मुलगी आमच्या धर्मातील नाही. काल मी सिनेमाला जाण्यासाठी तुझ्या घरी येत असताना माझी प्रेयसी सलमा भेटली. तिने आपल्यासोबत सिनेमाला येण्याचा आग्रह धरला. मी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. तिने सांगितले की, ‘‘तू माझ्याबरोबर सिनेमाला आला नाहीस तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन’’, या तिच्या बोलण्याने मी घाबरलो. तू मला समजून घेशील या आशेने मी तिच्यासोबत सिनेमाला गेलो. मित्रा, यासाठी तू मला शिक्षा देऊ नकोस!’ असे दीपकने रोहितला सांगितले. दीपकची केविलवाणी स्थिती पाहून रोहित क्षणभर गप्प बसला नंतर म्हणाला, ‘तू जातीबाहेरच्या मुलीवर प्रेम केलंस हे ऐकून मला बरे वाटले. अरे जाती या कोणी केल्या? या जातींची निर्मिती ही देवाने नव्हे तर मानवाने केली आहे. देवाने निर्मिती केली ती फक्त मानवता जातीची. तेव्हा तू काळजी करू नकोस. आता तुला शिक्षा म्हणजे तू आणि सलमाने विवाहबंधनात अडकणे!’
‘रोहित फार मोठं मन घेऊन तू आईच्या उदरात जन्माला आलास. मी जाती बाहेरील मुलीवर प्रेम केले म्हणून तू माझ्यावर रागावशील असं मला वाटलं होतं. पण तू तर माझी बाजू घेतली, ‘मित्र असावा तर तुझ्यासारखा’, असे पुटपुटत… दीपक आपल्या कामाच्या दिशेने निघून गेला. त्या पाठमोर्‍या मूर्तीकडे पाहून आपल्या मनात हसत रोहित आपल्या आस्थापनाच्या दिशेने निघून गेला. आपल्या हजेरीपटावर सही करून तो कामात गुंतला पण त्याचे मन कामात रमत नव्हते. तो फक्त दीपकच्या भवितव्याचा विचार करीत होता.
दीपकच्या प्रेम प्रकरणाला सहा महिने उलटून गेले. दीपक एक दिवशी घाईघाईने रोहितच्या घरी आला. दीपकला अचानक आल्याचे पाहून रोहित घाबरून गेला. रोहितने त्याला विचारले, ‘दीपक काय झालं?’.. यावर दीपक दबक्या आवाजात म्हणाला की, ‘काल मी आणि सलमा बाजारात फिरत असताना आईने पाहिले. मी घरी येताच आईने मला त्या मुलीविषयी विचारले. तेव्हा मी माझी प्रेमकथा आईला कथन केली असता आई रागावली. तिने सांगितले आहे की, ‘‘आमच्या घरात सून म्हणून येईल ती आमच्या जातीतीलच असेल. तेव्हा तू तिचा नाद सोडून दे. आज तुझे बाबा हयात असते तर… त्यांनीही तुला विरोध केला असता’’.
‘मित्रा मी लग्न करणार तर फक्त सलमाशीच आणि असे झाले नाही तर आम्ही दोघेही जीव देऊ..!’ असं म्हणून दीपक रडू लागला. यावर रोहित म्हणाला, ‘अरे, मी तुझ्या आईची समजूत काढून योग्य तोडगा काढीन’. एवढ्यातच राजेश धावत धावत आला आणि म्हणाला, ‘अरे.. रोहित, दीपकच्या आईला अपघात झाला असून तिचे खूप रक्त वाहून गेले आहे. चला लवकर… आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. तिघेही हॉस्पिटलमध्ये येताच रोहितने दीपकच्या आईची चौकशी केली असता तिला सलमाने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अपघातात शरीरातील रक्त वाहून गेल्याने आईला रक्ताची गरज होती. आईचा ‘ए’ रक्तगट होता. दीपक, रोहित आणि राजेश या तिघांचाही रक्तगट तपासला असता तो जुळला नाही. यावेळी तिथे असणार्‍या सलमाचा रक्तगट तपासावा, असा दीपकने आग्रह धरल्यावर डॉक्टरांनी सलमाचा रक्तगट तपासला. यावेळी सलमाचा रक्तगट हा दीपकच्या आईच्या रक्तगटाशी जुळला. सलमाचे रक्त दीपकच्या आईला मिळाल्यानंतर काही तासांनी ती शुद्धीवर आली. डॉक्टर म्हणाले, ‘सलमामुळेच आज तुझे प्राण वाचले. ती नसती तर आज तुम्हाला आपल्या प्राणाला मुकावे लागले असते’. हे ऐकून दीपकची आई रडू लागली. ‘पोरी तू मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तसेच मला रक्तदान करून तू मला जीवदान दिलेस. तुझ्यामुळेच मला माझा संसार पुन्हा पाहता आला. मीच तुझ्याशी चुकीची वागली. तू जरी जाती बाहेरची असलीस तरी तुझे रक्त हे जाती बाहेरचे नाही. आपण सर्व माणसं ही एकच आहोत. आज तू माझे डोळे उघडलेस. माझ्या मनात तू रक्ताचे नाते निर्माण केलेस.
पोरीऽ ऽ, माझ्या चुकीबद्दल तू मला माफ कर…’ असे तिने सलमाला सांगितले. ‘जीवदान देणारी व्यक्ती ही सर्वश्रेष्ठ असते. तेव्हा माझी सून म्हणून तू माझ्या घराचा उंबरठा ओलांडून ये’, असे म्हणून दीपकच्या आईने सलमाला घट्ट मिठी मारली. आईच्या नयनातून वाहणारे अश्रू हे पश्‍चात्तापाची साक्ष देत असल्याचे दीपक आणि रोहितने ओळखले.