‘वसंतहृदय चैत्र’

0
1067
  • दीपा ज. मिरींगकर                                                                                                                                                                               चैत्र हा तर मधुमास म्हणूनच ओळखला जातो. मुक्तेश्वरानी म्हटले आहे ‘पुष्पधुळीमाजी लोळे वसंत’ अनेक रंगीबेरंगी फुलांवर, त्यांच्या परागांवर वसंत लोळत असतो. नवोन्मेष – निर्मितीच्या चेतवणारा असा हा वसंत.निसर्ग नटून थटून तयार असतो उन्मत्त प्रेमासाठी, मिलनासाठी. विश्वाच्या निर्मितीमध्ये आपले चिमुकले क्षुद्र जीवन वापरून आनंद देता- घेता सारी बंधने झुगारत असल्या नसल्या शक्तीनिशी चैत्र पालवी येते. माझी आजी सांगायची की चैत्रात विहिरीला झरे फुटतात.

दुर्गाबाई भागवत आपल्या ‘ऋतुचक्र’ यापुस्तकात चैत्र महिन्याला ‘वसंतहृदय चैत्र’ म्हणतात. होळी या रंगीबेरंगी उत्साही सणानंतर अगदी लगेच येणारा चैत्र महिना. निसर्गसुद्धा रंग लेवून उभा असतो आणि त्याच वेळी प्रखर असे अंग भाजणारे उन तरीही संध्याकाळी येणारा शीतल वारा एकाच वेळी हवेत उष्णता आणि शीतलता या दोन्ही अनुभूती देत असतो. चैत्र हा तर मधुमास म्हणूनच ओळखला जातो. मुक्तेश्वरानी म्हटले आहे ‘पुष्पधुळी माजी लोळे वसंत’ अनेक रंगी बेरंगी फुलांवर, त्यांच्या परागांवर वसंत लोळत असतो. नवोन्मेष- निर्मितीच्या चेतवणारा असा हा वसंत.

संत ज्ञानेश्वरानी मधुमासाचे लक्षण –
जैसे ऋतुपतीचे द्वार | वनश्री निरंतर |
वोळगे फळभार लावण्येसी ॥
…अशा सुंदर रितीने केले आहे. ऋतूपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवानी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडते. फुलातून फळातून रंग रस.. मधुरस वाहत असतो. सुकल्या वठल्या झाडांना येणारी कोवळी हिरवी पालवी म्हणजे नवनिर्मितीची चाहूल. याच वेळी केवळ कोकिळाच नाही तर इतर अनेक पक्षी आपल्या कंठातून वेगवेगळे ध्वनी काढून आपल्या साथीदाराची मनधरणी करीत असतात. निसर्ग नटून थटून तयार असतो उन्मत्त प्रेमासाठी, मिलनासाठी. विश्वाच्या निर्मितीमध्ये आपले चिमुकले क्षुद्र जीवन वापरून आनंद देता घेता सारी बंधने झुगारत असल्या नसल्या शक्तीनिशी चैत्र पालवी येते. माझी आजी सांगायची की चैत्रात विहिरीला झरे फुटतात.

आजच मी आमच्या भाटातील सावरीचे झाड पाहिले. यापूर्वी एवढा नगण्य काटेरी वृक्ष की कोणाच्या खिजगणतीतही नसेल, पण तेच आता असंख्य लालचुटुक फुलांनी लगडलेले होते. जणू नुकत्याच संपलेल्या होळीतला गुलाल अजून मिरवत आहे. तो लाल रंग किती देखणा की दुरून वाटावे की गर्भ रेशमी लाल बुट्‌ट्याची हिरवी साडी नेसलेली नववधूच उभी आहे. काही दिवसांनी ग्रीष्म ऋतूत या फुलांचे वैभव गळून त्या जागी पांढरट पिवळट शेंगा दिसू लागतील, आणि या शेंगा सुकून तपकिरी काळ्या झाल्या की खाली पडून त्यातील पांढरा शुभ्र कापूस वार्‍याबरोबर त्यातील छोट्या काळ्या बियांना घेऊन जाईल नव्या जागी रुजायला.

या महिन्यात मधुमालतीचे गुलाबी पांढरे गेंद म्हणजे नेत्रसुखद अनुभूती. बाहेरच्या रणरणत्या उन्हातही आपला रंग दाखवत किवा आपल्या पानांना लपवून उभी असते. या फुलांचा रंग नेमका कोणता म्हणावा असा मला नेहमीच प्रश्न पडतो. कधी ती पांढरट तर कधी गुलाबी दिसतात. कधी त्यात राणी रंग मिसळलेला असतो. या सगळ्या रंगांचे एक सुंदर मिश्रण या मधुमालतीच्या घोसात दिसते. या फुलांची बिनदोर्‍याची वेणी करणार्‍या कितीतरी अस्तुरी घरातघरात असतात.

गोव्यात रानावनात चाराची झाडे हिरव्या चपटूल्या फळांच्या घोसांनी लगडलेली दिसतील. हाच रंग हळूहळू जांभळट काळा होतो. म्हणजे हे फळ तयार झाले. हे फळ काहीसे गुळमट मधुर असते. चोखून त्याची बी थुंकायची. मग त्यातून तयार होणार नवे झाड. खरे या फळाचे प्रयोजन पक्ष्यांनी खावे आणि नवीन झाड निर्माण व्हावे म्हणूनच. निसर्गनिर्मित बीचे संरक्षण आणि नव्या रोपासाठी नवी जागा मिळावी म्हणून केलेली योजना.

चैत्रात जवळजवळ सगळ्याच झाडांना नवी पालवी येते, पण यातील पिंपळ पालवी अगदी पाहण्यासारखी. गहिरी गुलाबी हृदयाच्या आकाराची ही पाने कोवळ्या उन्हात अशी चमकतात की जणू सुंदर फुलांचा गुच्छच. इतर झाडांची पाने छोटी असल्याने वार्‍याबरोबर हलत नाही पण पिंपळाची कोवळी पालवी सुद्धा सळसळते. त्यामुळे या झाडाला खरेच देववृक्ष म्हणावेसे वाटते. याच ‘पिंपळपानावर आपला पायाचा अंगठा चोखत असलेला बाळकृष्ण’.. हे एक सुंदर चित्र भक्तजनांच्या आवडीचे.

गोव्यात आतातर पांढरीशुभ्र मोगरीसुद्धा येऊ लागते. ही झाडे योग्य वेळी कापून त्यांना खतपाणी घालून मोठ्या मेहनतीने वाढवतात. याच्या कळ्यांची केळीच्या सोपाच्या दोर्‍याने गाथलेली वेणी घेऊन उभ्या असलेल्या मालिनी म्हणजे वनकन्याच. मोत्यांच्या त्या लडी घेऊन रस्त्याकडेला उभी असलेली मालन कधी ही विकली जातील आणि घरी जाऊन घरकाम करायच्या विचारात असते.

देवचाफ्याची पांढरी मोतिया रंगी फुले निष्पर्ण वृक्षावर अगदी उठून दिसतात. यात एक लाल चाफासुद्धा असतो. गडद गुलाबी लाल चाफासुद्धा पानांशिवाय फुललेला दिसतो. या फुलाची अंगठी करून दोन बोटांच्या मध्ये घट्ट धरून ठेवणे हा एक बालपणीचा खेळ होता. या चाफ्याला खुरचाफा या नावाने ओळखतात. याच्या पानाशिवाय काहीसे कुरूप बोथट दिसणारे खोड अचानक बारीक बारीक कोंबासारख्या दिसणार्‍या पांढरट लालूस कण्यांनी भरून जाते. त्यातूनच पुढे गुच्छ दिसू लागतात. ते झपाझप वाढून त्याचे दंडोरे बनतात. त्याच्या टोकाशी एक दिवस कळ्या दिसू लागतात. या कळ्या जवळजवळ वीस- बावीस दिवस वाढून त्याची फुले होतात. एकेक गुच्छ फुलतो. जुनी फुले गळतात. नवी येतात. सावरी, पळस आणि चाफा ही तिन्ही झाडे या वसंताचे पुष्पवैभव मिरवीत असतात.
आंब्याच्या झाडावर छोट्या छोट्या बाळ कैर्‍या आपले आगमन सांगताना फणसाचे झाडसुद्धा लेकुरवाळ्या बाईसारखे (पूर्वी बाईला खूप मुले असायची तशी) दिसते. मला तर या झाडाकडे पाहिले की श्रावण शुक्रवारचे जिवतीचे चित्र आठवते. एक मुल पाळण्यात, एक मांडीवर, एक बाजूला उभे बसलेले, एक मागे राहून गळ्यात हात घातलेले. तसा हा लेकुरवाळा फणस उभा असतो आपल्या लेकरांना घेऊन. एक- दीड महिन्यापूर्वी फणसाला मोठ्या मिरचीसारखे कळे येतात. पण फुलण्यापूर्वी त्याला चीर पडते आणि त्याचे वरचे आवरण गळून पडते. आतील फळ सुरवातीला गुळगुळीत असते, पण काहीच दिवसात त्यावर रवाळ दाणे दिसतात. त्या रव्याखाली बारीक दोर्‍यासारखे पांढरे तंतू येतात आणि याखालीच असतात ते फणसाचे प्रसिद्ध काटे. ते वाढले की फणस काटेरी ओळखीचा दिसू लागतो. या कोवळ्या फणसाची भाजी म्हणजे खवय्यांना मेजवानी आणि पिकले की मग त्याचे अनेक उपयोग… कधी गरे खावेत तर कधी उन्हात साटे घालावी. रसाळ गर्‍याची सांदणे म्हणजे बनवणारीसाठी एक मेहनतीचा प्रकार. पण चव एकदा खाल्ली की जन्मभर विसरणार नाही.

चैत्रगौरीच्या पूजेसाठी आणि हळदीकुंकू यासाठी तर हा सगळा रानमेवा असावा अशी अपेक्षा. गुढी पाडव्याच्या तिसर्‍या दिवशीपासून ते वैशाख तृतीयेपर्यंत म्हणजे अक्षय्यतृतीयेपर्यंत प्रत्यक्ष गौरी म्हणजे पार्वती माहेरी येते. सगळ्या घराघरांत पूजा आणि नैवेद्य हळदीकुंकू करतात. यासाठी वाटली डाळ, करवंद, फणसाचे गरे, चारा चुन्ना, जांभळे आणि प्यायला कैरीचे किंवा कोकम सरबत. अगदी हवामानाला पाहिजे तसे हे सारे असते. आणि याच दिवसात अंगणात असते ते चैत्रांगण. हा रांगोळीचा प्रकार माझा फार आवडता. आजकाल यासाठी अंगण आणि वेळ दोन्ही नाहीत. तरीही आपली हौस असल्या जागेत भागवणार्‍या काही कमी नाहीत. भारतीय संस्कृतीची अनेक शुभ चिन्हे मिरवत अजूनही ही रांगोळी कुठेतरी दिसते.

चैत्र शुद्ध नवमीला ‘रामनवमी’ असे म्हणतात. या दिवशी माध्यान्हीला .. तिसर्‍या प्रहराला अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. रामचंद्रांचा हा उत्सव सर्व ठिकाणी राममंदिरातून साजरा केला जातो. राम हा विष्णूचा सातवा अवतार मानीत असल्यामुळे काही काही ठिकाणी विष्णु मंदिरातूनही हा उत्सव साजरा करतात. राम मंदिरातून चैत्र शुध्द प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत असा नऊ दिवस म्हणजे रामनवरात्र तर काही ठिकाणी द्वादशीपर्यंत म्हणजे बारा दिवस हा उत्सव साजरा करतात. ह्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास रामजन्माचे कीर्तन सुरु होते. दुपारी- मध्यान्हकाळी कुंची घातलेली छोटी राममूर्ती किंवा नारळ.. पाना फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवतात आणि पाळण्याला झोका देतात. सर्व भाविक फुले उधळतात आणि रामनामाचा जयजयकार करतात. रामजन्म झाल्यावर बालरामाचे सर्व सोहळे म्हणजे न्हाऊ माखू घालणे, अंगाईगीत म्हणून त्याला पाळण्यात झोपवणे वैगरे करतात. ह्या दिवशी श्रीरामचरित्र कथा वाचल्या जातात. गोव्यात अनेक घरात मंदिरात रामजन्म असतो. याचा नैवेद्यसुद्धा रानमेवा आणि चण्याची उसळ असा असतो.

वसंत ऋतूची सुरवात होते ती गुढी पाडव्याने- जो साडे तीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो.
या दिवशी गुढी उभारताना बहिणाबाईची एक प्रसिद्ध कविता लक्षात ठेवली पाहिजे….
गुढीपाडव्याचा सन आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं सोडा मनांतली आढी
गेल सालीं गेली आढी आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी लोभ वाढवा वाढवा.