लोकोत्सव ग्रामीण भागात न्या : पर्रीकर

0
222

>> रंगारंग कलाविष्काराने ‘लोकोत्सव २०१८’चे उद्घाटन

लोकोत्सव युवाशक्तीसाठी आहे. तो केवळ पणजीत न होता ग्रामीण भागात पोचला पाहिजे. पूर्व नियोजन करून तो गावातही नेला जावा अशी सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल कला अकादमीच्या दर्यासंगमावर ‘लोकोत्सव २०१८’चे उद्घाटन सोहळ्यात बोलताना केली.

तत्पूर्वी, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते पारंपरिक गोव्यातील ‘माले’ प्रज्वलित करून १९व्या लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, कला संस्कृती सचिव दौलत हवालदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या लोकोत्सवात भारतीय समृद्ध अशा लोककलांचा आणि लोककलाकारांचा संगम पाहायला मिळतो. गोव्याची महान संस्कृती सातासमुद्रापलीकडे पोचावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे कला संस्कृती मंत्री श्री. गावडे यांनी सांगितले. उद्घाटनापूर्वी पारंपरिक रन नाचवत माशेलच्या कलाकारांनी पाहुण्यांना कार्यक्रमस्थळी आणले. कलात्मकदृष्ट्या आकर्षक अशा रंगमंचावर राजस्थानच्या मांगणीयार या लोकसंगीत प्रकाराने उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ झाला. ‘म्हारो पधारो मेरे देस…’ ही रचना सुरेख वातावरण निर्मिती करून गेली. उद्घाटनानंतर वेगवेगळ्या राज्यांतील लोककलाकारांनी एकत्रितरीत्या ‘पूर्वरंग’मध्ये घडविलेला कलाविष्कार रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. ओरिसाचे गोतिपुआ, राजस्थानचे भवाई, कालबेलिया, गुजरातचे केरवानो वेश व मेवासी, उत्तर प्रदेशचे चारकुला-मयूर, मणिपूरचे पुंग ढोल चोलम व थांग था, आसामचे बिहु, पश्‍चिम बंगालचे पुरुलिया चाहू व तमंग आणि गोव्याची ‘केपेची किरणा’ने सादर केलेली देखणी हे प्रकार सादर झाले.

कला संस्कृती संचालनालय, पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरने कला अकादमी, क्रीडा प्राधिकरण गोवा, पणजी महानगरपालिका, दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र – नागपूर, कला संस्कृती खाते – झारखंड यांच्या सहयोगाने हा लोकोत्सव घडवून आणला आहे. तो २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे.