अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून काँग्रेसच्या महिला खासदारांचा आरोप
काँग्रेस पक्षाच्या महिला खासदारांनी सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून, ते सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. आपण लोकसभेचे निष्पक्ष आणि स्वतंत्र संरक्षक म्हणून काम करावे, अशी मागणी देखील महिला खासदारांनी केली.
हे पत्र लिहिण्यासही तसेच कारण आहे. मागील गुरुवारी ओम बिर्ला यांनी असा दावा केला होता की, काँग्रेसचे काही खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ जाऊन एखादी अप्रिय घटना घडवू शकतात. त्यामुळे आपल्या विनंतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहात उपस्थित राहिले
नाहीत.
या पत्रावर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, खासदार वर्षा गायकवाड, ज्योती मणी तसेच इतर काही महिला खासदारांच्या सह्या आहेत. पत्रात महिला खासदारांनी नमूद केले आहे की, आम्ही हे पत्र अत्यंत दुःख आणि संवैधानिक कर्तव्याच्या भावनेतून लिहित आहोत. लोकसभेचे माननीय अध्यक्ष आणि या सभागृहाचे संवैधानिक रक्षक असताना, त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली विरोधी पक्षातील, विशेषतः काँग्रेसच्या महिला खासदारांविरोधात खोटे, निराधार आणि बदनामीकारक आरोप केले, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
महिला खासदारांनी असा दावा केला की, ‘इंडिया’ आघाडीतील आठ खासदारांना सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून निलंबित करण्यात आले, तर एका भाजप खासदाराला माजी पंतप्रधानांविषयी अपमानास्पद भाषा वापरण्याची मुभा देण्यात आली. न्याय मागण्यासाठी आम्ही आपल्याला भेटलो असता, आपण गंभीर चूक झाल्याचे मान्य करून संध्याकाळी पुन्हा येण्यास सांगितले. मात्र, पुन्हा भेटीत आपण सरकारच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असल्याचे सांगितले, यावरून या प्रकरणात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडे राहिले नसल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण घटनेमुळे लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांच्या स्वातंत्र्य आणि अधिकारांवर गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा महिला खासदारांनी केला. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येऊन पंतप्रधानांच्या अनुपस्थितीचे समर्थन करताना, लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या महिला खासदारांवर गंभीर आरोप केले, असेही पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधानांना विरोधकांचा
सामना करण्याची भीती
महिला खासदारांनी असा आरोप केला की, आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या जनविरोधी धोरणांविरोधात सातत्याने आवाज उठवतो आणि त्यांना उत्तरदायी ठरवतो, म्हणूनच आम्हाला लक्ष्य करण्यात येत आहे. पंतप्रधानांची अनुपस्थिती कोणत्याही सुरक्षेच्या कारणामुळे नव्हती, तर विरोधकांचा सामना करण्याचे धैर्य नसल्यामुळे ते सभागृहात आले नाहीत.
लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव येणार?
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, काल गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होऊ शकले नाही. दुसऱ्या बाजूला, लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याने, तसेच काँग्रेसच्या महिला खासदारांवर त्या पंतप्रधानांवर हल्ला करणार होत्या, असा आरोप केल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत.