Home Featured महाराष्ट्र : जिल्हा परिषदा, पंचायतसमिती निवडणुकांचा निकाल जाहीर

महाराष्ट्र : जिल्हा परिषदा, पंचायतसमिती निवडणुकांचा निकाल जाहीर

0

महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. भाजपने सर्वाधिक 7 जिल्हा परिषदा आपल्या ताब्यात घेतल्या, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रत्येकी 2 जिल्हा परिषदा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एका जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही.

महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील एकूण 12 जिल्हा परिषदांचे निकाल काल घोषित झाला. जिल्हा परिषदांसोबतच संबंधित जिल्ह्यांतील 125 पंचायत समित्यांचे निकालही काल जाहीर झाले.

महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांत यश मिळवल्यानंतर भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतही विजयी घोडदौड कायम ठेवते का, याकडे सर्वांचे लक्ष होते. या निवडणुकांतही भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे. बारापैकी 8 ते 9 जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष असेल, असा विश्वास भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला. जिल्हा परिषदेच्या एकूण 50 जागांपैकी तब्बल 41 जागांवर महायुतीने विजय मिळवून जिल्ह्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 27 जागा जिंकून स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 14 जागांवर यश मिळवले. दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून त्यांना केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. उर्वरित 6 जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली.