पणजी आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी मांडवी नदीत नवीन कॅसिनो जहाजाला विरोध दर्शविला असून, पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांना एक निवेदन काल सादर करण्यात आले.
पणजीतील मांडवी नदीत आणखीन एक नवीन कॅसिनो जहाज आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. स्थानिक रहिवासी वाल्मिकी नाईक, पॅट्रिशिया पिंटो आणि अन्य नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने महापौर रोहित मोन्सेरात यांची भेट घेऊन मांडवी नदीतील नवीन कॅसिनोला विरोध केला.
राज्य सरकारने नवीन कॅसिनोला मान्यता देत नसल्याचा दावा करीत असले तरी जुन्या परवान्याच्या आधारे एक मोठे जहाज मांडवी नदीत आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असा आरोप वाल्मिकी नाईक यांनी केला.
कॅसिनोमुळे मांडवी नदी प्रदूषित झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
पणजी महानगरपालिका कॅसिनो जहाजाला केवळ व्यापार परवाना दिला जातो, असे स्पष्टीकरण महापौर रोहित मोन्सेरात यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना केले. येत्या 12 फेब्रुवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या बैठकीत नवीन कॅसिनोच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.