Home Featured लोकसभा अधिवेशनात गदारोळ

लोकसभा अधिवेशनात गदारोळ

0

पंतप्रधान मोदींचे संबोधन लांबणीवर

विरोधक खासदारांच्या सततच्या गदारोळामुळे काल बुधवारी लोकसभेचे कामकाज 4 वेळा तहकूब झाले. सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देणार होते, परंतु विरोधक महिला खासदारांच्या गदारोळामुळे अध्यक्षा संध्या राय यांनी कामकाज गुरूवारपर्यंत तहकूब केले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संबोधन लांबणीवर पडले आहे.

सायंकाळी 5 वाजता जेव्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा विरोधक महिला खासदारांनी सत्ताधारी नेत्यांच्या खुर्च्यांना घेराव घातला. यात पंतप्रधान मोदींच्या खुर्चीचाही समावेश होता. महिला खासदारांच्या हातात मोठे फलक होते, ज्यावर ‘जे योग्य आहे, ते करा’ असे लिहिले होते.
या महिला खासदार मंगळवारी 8 विरोधक खासदारांच्या निलंबनाचा निषेध करत होत्या. गदारोळामुळे अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले. काही मंत्र्यांनी विरोधक खासदारांना जाण्यास सांगितले, त्यानंतर त्यांनी घेराव बंद केला.

अहवालानुसार, पंतप्रधानांच्या खुर्चीला घेराव घालणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड आणि ज्योतिमणी यांचाही समावेश होता.
संसदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात विरोधी पक्ष आणि भाजप खासदारांमध्येही वाद झाला.
दरम्यान, लोकसभेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी गांधी कुटुंब आणि काँग्रेसवर लिहिलेली पुस्तके आणि नोट्स दाखवल्या. ते म्हणाले की, या पुस्तकांमध्ये गांधी कुटुंब आणि काँग्रेस कुटुंबाची लबाडी, गद्दारी, भ्रष्टाचार यांचा उल्लेख आहे.
यानंतर विरोधी खासदारांनी कालही अध्यक्षांच्या आसनाकडे कागद फेकले. याच कृतीमुळे मंगळवारी 8 विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले होते.

अमेरिका-भारताचा व्यापार
करार ऐतिहासिक ः गोयल

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी, लोकसभेत अमेरिकेसोबतच्या टॅरिफ करारावर निवेदन दिले. त्यांनी, हा करार ऐतिहासिक आहे. भारताच्या कृषी आणि अन्न क्षेत्राची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. हा करार भारताच्या विकासासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल असे म्हटले.