जम्मू-काश्मीर राज्यातील उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलाने बुधवारी केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईत हे मोठे यश प्राप्त झाले आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या एका टॉप कमांडरचा या कारवाईत मृत्यू झाला आहे.
एका विश्वसनीय गुप्त माहितीनुसार उधमपूर जिल्ह्यातील बसंतगडच्या जंगली भागात संशयित दहशतवादी असल्याचे सुरक्षा दलांना समजले. त्यानंतर या माहितीच्या आधारे, भारतीय लष्कराच्या सीआयएफ डेल्टा, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफने यांनी संयुक्त कारवाई करत या भागात नाकाबंदी केली व शोधमोहीम सुरू केली. संध्याकाळी 4 च्या सुमारास, सुरक्षा दल जोहपर-मार्ता गावाजवळील जंगली भागात शोध घेत असताना, लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दहशतवादी व सुरक्षा दलांत जोरदार चकमक सुरू झाली. यावेळी दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने परिसराची नाकाबंधी केली. यावेळी त्वरित अतिरिक्त सैन्य घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यामुळे दहशतवाद्यांचे बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे होते. सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली असून या भागात अजून दहशतवादी लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उधमपूर आणि आसपासच्या डोंगराळ भागात काही काळापासून दहशतवादी कारवायांच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे ही कारवाई सुरक्षेसाठी एक मोठे यश मानले जात आहे.