>> सरकार उच्च न्यायालयात आव्हान देणार
आपल्या सहकारी महिला पत्रकारावरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित आरोपी तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. उत्तर गोव्यातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांनी या प्रकरणातील निवाडा जाहीर केला. सुमारे साडेसात वर्षांनंतर यावरील निकाल लागला आहे. या निकालाला सरकारकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.
बांबोळी येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये नोव्हेंबर २०१३ मध्ये हा कथित बलात्काराचा प्रकार घडला होता. त्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी संशयित तेजपाल यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. ही घटना घडल्यानंतर सुमारे ७९ दिवसांनी तेजपालवर आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी इनकॅमेरा घेण्यात आली.
सत्र न्यायालयाच्या आरोप निश्चितीच्या आदेशाला तेजपाल यांनी सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात तसेच त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान अर्ज दाखल केला होता. तो फेटाळण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने यावरील सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले होते.
उच्च न्यायालयात आव्हान देणार ः मुख्यमंत्री
म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या तरुण तेजपाल प्रकरणी निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तेजपाल प्रकरणी निवाडा अनपेक्षित आहे. एका महिलेवर अन्याय झालेला आहे. महिलेवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही. वरच्या न्यायालयात निवाड्याला आव्हान दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.