पंजाबमधील लुधियाना येथे पोलिसांनी दहशतवाद्यांचा एन्काउंटर केला आहे. दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावरील लाडोवाल टोल प्लाझाजवळ ही चकमक झाली. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी एक दिवस आधी हरियाणा आणि बिहारमधील दहशतवाद्यांना हातबॉम्बसह अटक केली होती. चौकशीतून त्यांचा ठावठिकाणा कळला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, पोलिसांनी त्यांना घेरले तेव्हा त्यांनी गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. दोन दहशतवादी जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन हातबॉम्ब, चार पिस्तूल आणि 50 हून अधिक काडतुसे जप्त केली आहेत. चकमकीची माहिती मिळताच पोलिस आयुक्त स्वपन शर्मा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, हे दहशतवादी पाकिस्तानच्या आयएसआयच्या पाठिंब्याने कार्यरत असलेले एक दहशतवादी मॉड्यूल होते आणि ते मोठा हल्ला करण्याची योजना आखत होते.

