दोनापावल, गणेशपुरी आणि आता बायणा. गेल्या काही महिन्यांतील ह्या सातत्याने सुरू असलेल्या सशस्त्र दरोड्यांमुळे गोवा हादरून गेला आहे. पोलिसांविषयी, गृहखात्याविषयी जनतेच्या मनात तीव्र नाराजी दिसते आहे, कारण ह्यापूर्वीच्या दोन्ही दरोड्यांच्या प्रकरणांतील खरे सूत्रधार अजूनही फरार आहेत. ते बांगलादेशात पळून गेल्याची सबब सांगितली गेली. अजूनही त्या दरोड्यांतील मुद्देमाल सापडलेला नाही आणि त्या दरोडेखोरांचे तर नखही हाती लागलेले नाही. केवळ काही संशयितांना पुढे करून तपास थांबला आहे. त्या प्रकरणांचा जर खरेच तपास झाला, तर मग आता ही बायणात दरोडा घालणारी टोळी कोणती? सशस्त्र दरोड्यांच्या दोन घटना घडूनही परवा रात्री वास्कोत पोलीस गस्त का नव्हती? हे तब्बल सहा – सात सशस्त्र दरोडेखोर एवढे खुलेआम कसे काय फिरू शकले? गुन्हा करून राजरोस पळून कसे जाऊ शकले? ह्या प्रश्नांची उत्तरे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना द्यावीच लागतील. एखादा अकल्पित गुन्हा घडतो, तेव्हा त्यापासून धडा घेऊन त्याची पुनरावृत्ती होऊ नये ह्यासाठी सज्जता ठेवायची असते. परंतु सातत्याने दोन मोठे गुन्हे घडूनही पुन्हा तिसरा गुन्हा घडतो ह्याचा अर्थ काय घ्यायचा? पोलीस यंत्रणेसाठी ही अत्यंत नामुष्कीची आणि लाजीरवाणी बाब आहे. रामा काणकोणकर प्रकरणात, पूजा नाईक प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी मंत्र्यांना वाचवायला वारंवार पुढे सरसावल्याचे जनतेने पाहिले. मग राज्यातील ह्या थरकाप उडवणाऱ्या गुन्हेगारीबाबत ते मूग गिळून गप्प का? बायणामधील दरोड्याचा पूर्वी पडलेल्या दरोड्यांशी संबंध असेल नसेल, परंतु पद्धत तर तीच आहे. पहाटे लोक साखरझोपेत असताना प्राणघातक शस्त्रांनिशी मोठ्या संख्येने एखाद्या आधीच टेहळणी करून ठेवलेल्या घरात घुसायचे. घरातल्यांना त्यांच्या वयाचा, प्रकृतीचा विचार न करता बेदम मारहाण करीत प्रचंड दहशत निर्माण करायची आणि घरातील आणि अंगावरील सर्व ऐवज काढून घेऊन शांतपणे अगदी आरामात पोबारा करायचा. हे दरोडे पडतात तेव्हा घरांमध्ये अर्धा अर्धा तास लूट चालते, एवढ्या बिनधास्तपणे हे दरोडे पडत आहेत ह्यावरून पोलीस यंत्रणेचा किती धाक ह्या गुन्हेगारांना उरला आहे हे स्पष्ट कळून चुकते. पूर्वी गोव्यात कधीमधी असे दरोडे पडायचे, परंतु घर बंद असल्याचे पाहून, बहुधा गणेश चतुर्थीच्या काळात वगैरे अशा चोऱ्या व्हायच्या. परंतु आता घरात माणसे असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ले चढवीत खुलेआम दरोडे घातले जात आहेत. गोमंतकीय जनता आज आहे तेवढी असुरक्षित आजवर कधीही नव्हती. उद्या अशा दरोड्यांत खून पडतील, बलात्कार होतील. राज्यात हे काय चालले आहे? खरे म्हणजे आजचा काळ प्रगत तंत्रज्ञानाचा आहे. शहरांमध्ये तर सर्वत्र सीसीटीव्ही लावलेले असतात. मग ह्या सीसीटीव्हींचे रिअल टाइम मॉनिटरिंग का केले जाऊ नये? केवळ वाहतुकीचे ‘तालांव’ देण्यापुरता कॅमेऱ्यांचा उपयोग करण्यापेक्षा गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांचा वेळीच माग काढण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे वापरले तर जनतेला थोडा भरवसा तरी वाटेल. किमान रात्रीच्या संशयास्पद हालचालींवर याद्वारे नजर ठेवता येऊ शकते. वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन राज्यात खासगी आणि सार्वजनिक सीसीटीव्हींचे फीड मिळवून पोलीस दलांतर्गत रिअल टाइम मॉनिटरिंग सुरू करावे. त्यासाठी सुसज्ज कंट्रोल अँड कमांड सेंटर उभारावीत. राज्यातील सर्व पोलीस स्थानकांमध्ये हे करता येणे सहजशक्य आहे. रात्रीची गस्त वाढवावी. नाकाबंदी कायम ठेवावी. संशयास्पद व्यक्तींची सखोल चौकशी व्हावी. राज्यातील पर्यटक आणि स्थलांतरितांवर तर कोणाचेही लक्ष नाही. कोणीही यावे, सुखाने मौजमजा करीत राहावे आणि लुटून पसार व्हावे असा सारा प्रकार चालला आहे. रात्रीची पोलीस गस्त, पोलिसांचा दरारा, तपास अधिकाऱ्यांचे चातुर्य तर केव्हाच इतिहासजमा झाले आहे. वशिल्याने आणि पैसे चारून भरती झालेल्यांच्या हाती आज पोलीस दलाची सूत्रे आहेत त्याची ही फळे आहेत. परप्रांतांतून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर गोमंतकीयांच्या सुरक्षेशी काहीही देणेघेणे दिसत नाही. गोव्यात यायचे, मंत्र्यांची मर्जी सांभाळायची, मोक्याच्या ठिकाणी जमिनी घ्यायच्या, बंगले बांधायचे, सग्यासोयऱ्यांनाही त्यासाठी सक्रियपणे मदत करायची हेच चालले आहे. त्यामुळे गोव्याची सुरक्षा आज कधी नव्हे एवढी वाऱ्यावर आहे. संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्धे, सामाजिक कार्यकर्त्यांवरील प्राणघातक हल्ले, सशस्त्र दरोडे यांनी पोलीस दलाची अब्रू हरघडीस वेशीवर टांगली जाऊ लागली आहे. पोलीस खात्याच्या आणि गृहखात्याच्या प्रतिष्ठेला लागलेला हा कलंक पुसण्यासाठी आता सरकारने जागे व्हावे. ह्या गुन्हेगारांना हुडकून सजा द्यावी आणि जनतेला सुरक्षिततेचा भरवसा द्यावा.