मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
राजधानी पणजीत 56 व्या चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन
गोव्यात चित्रीकरणासाठी येणाऱ्या निर्माता – दिग्दर्शकांना सर्व सोयी सुविधा पुरवणे तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रीकरण व अन्य सर्व कामांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यावर सरकार भर देणार आहे. गोवा हे चित्रपट निर्मितीसाठीचे एक जागतिक केंद्र बनवण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे व त्यासाठीची आवश्यक ती साधनसुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इफ्फीचे उद्घाटन झाल्यानंतर सांगितले.
पणजीत जुन्या गोमेकॉ इमारतीसमोरील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या रंगमंचावर काल 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोव्याचे राज्यपाल पी. अशोक गजपती राजू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यंदा पारंपरिक समई प्रज्वलनाऐवजी तुळशीच्या झाडाच्या रोपट्यांना कुंभातून पाणी घालून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपालांबरोबरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, इफ्फीचे संचालक शेखर कपूर, अनुपम खेर आदींंनीही तुळशीच्या रोपट्याला पाणी घालून आगळ्यावेगळ्या पद्धतीने इफ्फीचे उद्घाटन केले.
याप्रसंगी पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोवा हे इफ्फीसाठीचे कायम स्थळ बनून इफ्फी गोव्यात आल्यापासून इफ्फीच्या आयोजनात तर आमुलाग्र असे बदल झाले आहेत. शिवाय इफ्फी गोव्यात आल्यानंतर इफ्फीमुळे गोव्याचाही बराच विकास झाल्याचे नमूद केले. इफ्फीमुळे राज्याच्या पायाभूत साधनसुविधेत बराच विकास झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय गोव्याच्या संस्कृतीचे दर्शनही जगभरातून येणाऱ्या इफ्फीच्या प्रतिनिधींना व चित्रपटकर्मींना होऊ शकल्याचे स्पष्ट केले. गोव्याने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी जागतिक स्तराची साधनसुविधा उपलब्ध करुन दिल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 56व्या इफ्फीचे पणजीत खुल्या जागेत आयोजन करण्याचा व त्यानिमित्त गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीचा त्यात समावेश करण्याचा एक चांगला निर्णय घेतल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक व इफ्फीचे संचालक शेखर कपूर, चित्रपट अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य सुपरस्टार नंदापुरी बालकृष्ण, हिंदी चित्रपट दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश, अभिनेत्री पुनम धिल्लन, मराठी चित्रपट अभिनेता मनोज जोशी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, प्रदेश भाजप अध्यक्ष दामूू नाईक आदी मंडळी हजर होते.
चित्ररथ मिरवणूक
या सेोहळ्याला सुमारे 3 हजार लोक उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. त्यात गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन दाखवणाऱ्या चित्रपटांबरोबरच चित्रपट निर्मिती कंपन्यांच्या चित्ररथांचाही समावेश होता.
नंतर इफ्फीचा शुभारंभ चित्रपट असलेला ‘द ब्ल्यू ट्रेल’ या चित्रपट दाखवण्यात आला. पणजी, मडगांव, पर्वरी व फोंडा अशा चार ठिकाणी 14 थिएटर्स मधून हा चित्रपट दाखवण्यात आला.
गोमंतकीय चित्रपटकर्मींना अर्थसाहाय्य योजना ः सावंत
गोव्यातील चित्रपटकर्मीसाठीही सरकारने अर्थसाहाय्य योजना सुरू केलेली असून चित्रपटाच्या श्रेणीतून जास्तीत जास्त 50 लाख रु. या योजनेखाली देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी देश-विदेशांतून मोठ्या संख्येने निर्माते येत असून ते फक्त गोव्याच्या सौंदर्यामुळे येथे येत नसून त्यांना चांगल्या सोयी-सुविधांमुळेही मोठ्या संख्येने येतात असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटकर्मींना भविष्यात गोव्यात येण्यासाठी आणखी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना आणखी सुविधा देण्यात चित्रीकरणासाठीची परवानगी लवकर मिळावी यासाठी चित्रीकरणासाठीच्या नियमांचे सुलभीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चित्ररथ मिरवणुकीमुळे गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन ः राज्यपाल
राज्यपाल पी. अशोक गजपती राजू यांनी यावेळी बोलताना यंदा इफ्फीच्या उद्घाटनानिमित्त गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हा निर्णय स्वागतहि असल्याचे सांगताना त्यामुळे देश-विदेशातून इफ्फीसाठी गोव्यात आलेल्या चित्रपटसृष्टीसाठी कलाकार व प्रतिनिधींना गोव्याच्या समृद्ध अशा संस्कृतीचे दर्शन घडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नांमुळे गोवा हे इफ्फीसाठीचे कायम केंद्र बनले असून तेव्हापासून आतापर्यंत गोव्यात इफ्फीचे धडाक्यात व शानदारपणे आयोजन होत असल्याचे राज्यपाल म्हणाले. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही इफ्फीच्या आयोजनासाठी सर्व ते सहकार्य करीत असून त्यामुळे या सोहळ्याच्या आयोजनात कोणत्याही अडचणी येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नंदामुरी बालकृष्णा यांचा सन्मान
तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नंदामुरी बालकृष्णा यांनी तेलगू चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना नंदामुरी बालकृष्ण यांनी एकेकाळचे दिग्गज अभिनेते एन. टी. रामाराव यांच्या पुत्र म्हणून आपला जन्म झाला याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले. आज आपण जो काही आहे तो आपल्या वडिलांमुळेच असे भावपूर्ण उद्गार त्यांनी यावेळी काढले.