राज्यपालांना आम आदमी पक्षाचे निवेदन सादर
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करून आम आदमी पक्षाचे आमदार विंन्झी व्हिएगश यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची दोनापावल येथील राजभवनात काल भेट घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
आमदार व्हिएगश यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एक निवेदन सादर केले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे, असे राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
एकेकाळी सुरक्षित असलेल्या गोवा राज्यात भाजपच्या काळात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही. दरोडे, चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच, खून, महिला, मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असा आरोप आमदार व्हिएगश यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला.
गृहखाते इतरांकडे द्यावे ः उपसभापती
राज्यात सध्या दिवसाढवळ्या तसेच रात्री मध्यरात्रीही दरोडे पडत आहेत. दरोडेखोर सोन्याच्या वस्तू, रोख रक्कम नेतातच आणि घरातील व बंगल्यातील लोकांना बांधून मारहाण करतात त्यामुळे आज लोकात भीतीचे वातावरण आहे. यासाठी गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कटाक्षानी लक्ष केंद्रित करावे किंवा गृहखाते इतरांकडे सोपवावे अशी मागणी म्हापशाचे आमदार तथा उपसभापती ज्योशुआ डिसोझा यांनी केली. राज्यात वाढती गुन्हेगारी ही गंभीर गोष्ट असून डॉ. सावंत यांनी यावर कडक पावले उचलावीत असे डिसोझा म्हणाले.