गोवा, दिल्ली आणि हरयाणातील 10-12 ठिकाणांवर ईडी, आयकर खात्याची छापेमारी; महत्त्वाची कागदपत्रे, पुरावे जप्त
‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईटक्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांच्यासह सहमालक अजय गुप्ता, फरार संशयित सुरिंदर कुमार खोसला, हडफडे-नागवा पंचायतीचे अपात्र सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर व इतरांच्या घरे आणि मालमत्तांवर काल ईडी व आयकर खात्याने छापा टाकला. वरील सर्व संशयितांच्या गोवा, दिल्ली आणि हरयाणातील घरे, कार्यालये व अन्य मालमत्तांवर काल सकाळी 6 वाजल्यापासून एकाच वेळी छापे टाकण्यात आले. दोन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांनी मिळून एकाच वेळी सुमारे 10 ते 12 ठिकाणी हे छापे मारले. अवैध मालमत्ता, आर्थिक गैरव्यवहार व मनी लाँड्रिंगबाबत चौकशीसाठी हे छापे मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोवा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे सक्तवसुली संचालनालयाने आरोपींविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्याखाली ईसीआयआर दाखल केली आहे.
लुथरा बंधूंच्या दिल्लीतील किंग्सवे कॅम्प, तसेच हरयाणाच्या गुरुग्राम येथील निवासस्थानांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हे छापे मारले. तसेच सुरिंदरकुमार खोसला (बर्च नाईट क्लब जेथे उभारण्यात आला होता, त्या जमिनीचे कथित मालक) यांच्या मालमत्तेवरही छापे मारले.
त्याचबरोबर गोव्यात हडफडे-नागवा पंचायतीचे अपात्र सरपंच रोशन रेडकर व बडतर्फ सचिव रघुवीर बागकर यांच्या निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले. रेडकर यांच्या हडफडे येथील, तर बागकर यांच्या मयडे येथील निवासस्थानांवर शुक्रवारी सक्तवसुली संचालनालय व आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी
छापे मारले.
या छाप्यात महत्वाची कागदपत्रे, बँक व्यवहार नोंदी, डिजिटल उपकरणे, करारनामे, रोख व्यवहारासंबंधीचे पुरावे आदी साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रोशन रेडकर हे ‘बर्च’मधील आगीच्या दुर्घटनेनंतर फरार झाले होते; मात्र बऱ्याच दिवसांनंतर 22 जानेवारीला न्यायालयासमोर शरण आल्यानंतर हणजूण पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. लुथरा बंधूंच्या बर्च नाईटक्लबला बेकायदेशीरपणे परवाना दिल्याचा आरोप रोशन रेडकर यांच्यावर आहे. बडतर्फ करण्यात आलेले पंचायतीचे तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांच्यावरही बेकायदा कृत्यात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे.
साकवाडी हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबला 6 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या दरम्यान लागलेल्या भीषण आगीत 5 पर्यटक आणि क्लबच्या 20 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तसेच मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश होता. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले होते.
या प्रकरणात गेल्या दीड-दोन महिन्यात गोवा पोलिसांनी जवळपास 11 जणांना अटक केली होती. एका दिवसापूर्वीच अपात्र सरपंच रोशन रेडकर यांना या प्रकरणात अटक झाली होती.
तीन राज्यांत छापेमारी
आगीत भस्मसात झालेला बर्च नाईटक्लब हा अवैध असल्याचे उघडकीस झाल्यानंतर क्लबचे मालक ईडीच्या रडारवर आहेत. मनी लाँड्रिंगच्या अनुषंगाने तपास करताना ईडीने शुक्रवारी सौरभ आणि गौरव या लुथरा बंधुंशी निगडीत मामत्तांवर छापेमारी केली. ईडीने शुक्रवारी दिल्ली, गोवा आणि हरियाणात छापेमारी केली.
ईडीची शोधमोहीम
नाईटक्लबच्या मालकीशी निगडीत कागदपत्रांची तपासणी, कार्यपद्धती आणि आर्थिक व्यवहार याचा तपास करण्याच्या उद्देशाने ईडीने ही छापेमारी केली, अशी माहिती समोर आली आहे. नियमांना धाब्यावर बसवून नाईटक्लबला परवाना दिल्याचा आरोप करण्यात आल्याने गोव्यात वाढलेल्या अवैध व्यवसायांबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे.