Home Featured युनिटी मॉलजवळील निवडक जागेच्या सर्वेक्षणास आक्षेप

युनिटी मॉलजवळील निवडक जागेच्या सर्वेक्षणास आक्षेप

0

आज तोयार तळ्याजवळील संपूर्ण भागाचे गुगल इमेजरीद्वारे विविध खात्यांकडून सर्वेक्षण होणार

चिंबल येथील ग्रामस्थांनी तोयार तळ्याजवळील युनिटी मॉल प्रकल्पाच्या निवडक जागेचे सर्वेक्षण करण्यास आक्षेप काल घेतला. तोयार तलावाजवळील संपूर्ण साडेचार लाख चौरस मीटर जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी लावून धरल्याने अखेर सर्वेक्षण शनिवार दि. 24 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. तोयार तळ्याजवळील संपूर्ण भागाचे गुगल इमेजरीचा वापर करून शनिवारी संयुक्त सर्वेक्षण केले जाणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी युनिटी मॉलच्या विषयावर बुधवारी ग्रामस्थांच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या बैठकीत तोयार तळ्याजवळील युनिटी मॉल प्रकल्पाच्या जागेचे फेरसर्वेक्षण शुक्रवार दि. 23 रोजी करण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर युनिटी मॉलच्या जागेच्या सर्वेक्षणासाठी सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी शुक्रवारी सकाळी चिंबलमध्ये दाखल झाले. त्यांनी युनिटी मॉल प्रकल्पासाठीच्या जागेचे संयुक्त सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती चिंबल ग्रामस्थांना दिली.
तोयार तळ्याजवळील युनिटी मॉल उभारण्यात येणाऱ्या सर्वे क्रमांक 40 (1) आणि त्याच्या प्रभाव क्षेत्राची संयुक्त मोजणी करण्यासाठी जलस्रोत, जैवविविधता मंडळ, गोवा पर्यटन विकास महामंडळ व इतर खात्यांचे अधिकारी आले होते.

यावेळी ग्रामस्थांनी युनिटी मॉलसाठी वापरण्यात येणाऱ्या निवडक जागेचे सर्वेक्षण करण्यास आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत संपूर्ण जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती ग्रामस्थांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिली. तसेच, तोयार तळ्याच्या संपूर्ण परिसराचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

तोयार तळ्याच्या संपूर्ण परिसराच्या सर्वेक्षणासाठी सरकारकडून मान्यता घेतल्यानंतर प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
चिंबल ग्रामस्थाच्यावतीने ॲड. मेलिसा यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी फेरसर्वेक्षणाच्या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत तोयार तळ्याजवळील संपूर्ण पाणथळ क्षेत्राचे नव्याने सीमांकन व सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती, असे ॲड. मेलिसा यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक गोविंद शिरोडकर, अजय खोलकर व इतरांची उपस्थिती होती.