लसीकरणावर भर देण्याची मोदींची सूचना

0
138

>> मुख्यमंत्र्यांची माहिती, पंतप्रधानांकडून रुग्णवाढीचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनी करून राज्यातील कोरोना रूग्ण वाढीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन किंवा संचारबंदी लागू न करता कोरोना लसीकरणावर भर देण्याची सूचना केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य सरकारच्या लॉकडाऊनचा पर्याय न स्वीकारण्याच्या निर्णयाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली, असल्याचीही माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी लॉकडाऊन किंवा रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतील. यापूर्वी केलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार हळूहळू पूर्ववत होत असताना पुन्हा लॉकडाऊन केल्यास अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. नागरिकांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

राज्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. नागरिकांनी राज्यात येणार्‍या पर्यटकांच्या संपर्कात येऊ नये. केंद्र सरकारकडे पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍या ४५ वर्षांखालील कामगारांना कोरोना लस देण्यास मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकानुसारच
राज्य सरकारने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करणे किंवा पुढे ढकलण्याचा विचार तूर्त केलेला नाही. दहावी आणि बारावीची परीक्षा वेळापत्रकानुसार आवश्यक एसओपीचे पालन करून घेतली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. गतवर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा एसओपीेचे पालन करून घेण्यात आली. त्याचप्रमाणे यावर्षी सामाजिक अंतर, मास्क आदी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेतली जाणार आहे. शिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. २४ एप्रिल पासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा १७ मे पासून सुरू होणार आहे.