लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात ५२० जणांना कोरोना लस

0
176

>> एकूण ९४६ आरोग्य कर्मचार्‍यांना लस

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात ५२० आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस काल देण्यात आली. राज्यात आत्तापर्यंत ९४६ आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात आली आहे.
राज्यात कोरोना लसीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या वेळी केवळ ६० टक्के आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोना लसीकरणाला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यातील कोरोना लसीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुसर्‍या टप्प्यात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दोन केंद्रांतून २०० आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर यांनी दिली.

वाळपई येथील आरोग्य केंद्रात ६२, व्हिजन इस्पितळात ४८, पेडणे आरोग्य केंद्रात ५९ तर म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात ५७ तर व्हिक्टर इस्पितळात ९४ ,जणांना लस दिली. राज्यातील सुमारे १९ हजार आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचार्‍यांना पहिल्या टप्प्यात कोरोना लस दिली जाणार आहे.

कोरोनाने राज्यात एकाचा मृत्यू

राज्यात चोवीस तासांत आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच, नवीन ७० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ७८२ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ८५४ एवढी आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७५८ एवढी झाली आहे.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी ८० रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार १७० एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९५ टक्के एवढे आहे.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ३६ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. नवीन १६ कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.
राज्यात चोवीस तासांत आणखी १६९४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. पणजी परिसरातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९० झाली आहे. पणजी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे.