ओल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी पालिकाक्षेत्रात प्रकल्प ः मुख्यमंत्री

0
208

>> पणजीत बायोे डायजेस्टरचे उद्घाटन

राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात ओल्या कचर्‍याची विल्हेवाटीसाठी लहान लहान बायो डायजेस्टर प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडून पुढाकार घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

पणजी महानगरपालिकेने कचरा विल्हेवाटीसाठी बसविलेल्या बायो डायजेस्टरचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. बायो डायजेस्टर कचरा विल्हेवाट प्रकल्पातून तयार होणारा बायो गॅस प्रकल्पाच्या आसपासच्या रेस्टॉरंटना मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी बायो डायजेस्टर प्रकल्प उपयुक्त आहे. तसेच, सेंद्रिय खताची निर्मिती केली जात आहे. राज्य सरकारकडून काकोडा येथे नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात लहान लहान कचरा प्रकल्प कार्यान्वित केल्यास कचरा विल्हेवाटीच्या समस्येवर तोडगा निघू शकतो. केंद्रीय योजनेतून आर्थिक साहाय्य घेऊन प्रकल्प उभारले जाऊ शकतात. राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्य केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पणजीत १२ प्रकल्प
केंद्रीय योजनेअंतर्गत पणजी महानगरपालिका क्षेत्रात १२ बायो डायजेस्टर बसविण्यात येणार आहेत. त्यातील एका बायो डायजेस्टरचे काम पूर्ण झाले असून दोन बायो डायजेस्टरचे काम अंतिम टप्प्यात आहे. बायो डायजेस्टर बसविण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. महानगरपालिकेकडून ओल्या कचर्‍याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात अ,सल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.