लसीकरणाचे आव्हान

0
130
  • बबन विनायक भगत

भारतात आतापर्यंत केवळ ३ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण (म्हणजे दोन्ही डोस) झालेले आहे. पूर्ण लसीकरण होण्यात (सर्व नागरिकांना दोन्ही डोस) आणखी किमान तीन वर्षे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण १३० कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतासाठी लसीचे डोस मिळवणे हे एक मोठे आव्हान आहे.

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून ती पहिल्या लाटेपेक्षा जास्त जीवघेणी ठरली आहे. या दुसर्‍या लाटेनंतर आता तिसरी लाट येऊ घातली आहे. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त धोक्याची ठरू शकते, असा इशारा साथीच्या रोगांच्या तज्ज्ञानी दिलेला आहे.
कोविडच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजवला असून मोठ्या संख्येने लोक कोविडचे बळी ठरू लागले आहेत. जगातील एक महाशक्ती असलेल्या अमेरिकेत कोरोनामुळे सहा लाख लोकांचे बळी गेले आहेत. आपल्या भारतातही आतापर्यंत कोविडमुळे ३ लाख लोकांवर आपले प्राण गमावून बसण्याची पाळी आली आहे. कोविडने आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक बळी घेतले असून ही संख्या ८९,२१२ एवढी आहे. कर्नाटकात २५,८११, तामिळनाडूत २०,८६२, उत्तर प्रदेशात १९,३६२, केरळमध्ये ७,५५४, तर आपल्या इवल्याशा गोव्यात आतापर्यंत कोविडमुळे २,५०० जणांचे प्राण गेलेले आहेत. देशभरात आतापर्यंत २,७१,५६,३८२ एवढ्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांपैकी ३ लाखांवर लोकांचे कोविडमुळे प्राण गेले. आणि कोरोनाचा हा संसर्ग व मृत्युसत्र काही थांबायचे नाव घेत नाही.

या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जगासाठी, त्यातल्या त्यात समाधानाची म्हणता येईल अशी एकच बाब आहे, ती म्हणजे, आपणाकडे असलेली कोविडवरील लस. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपणाकडे असलेलं धारदार शस्त्र म्हणजे लस होय. वेगवेगळ्या देशांनी कोविडवरील वेगवेगळ्या लसी तयार केल्या आहेत. आतापर्यंत कोविडवर वेगवेगळ्या ७५ लसी तयार करण्यात आलेल्या आहेत. मात्र, यांपैकी सगळ्याच लसींना वापरासाठी मान्यता मिळालेली नाही. आतापर्यंत कोविडवरील फक्त १५ वेगवेगळ्या लसींना आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी मिळालेली आहे.

भारतात तीन लसींना मान्यता
भारतात या घडीला ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सीन’ व ‘स्पुतनिक व्ही’ या तीन लसींना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे. त्यांपैकी कोविशिल्डला १ जानेवारी २०२१ रोजी तर कोव्हॅक्सीनला ३ जानेवारी २०२१ रोजी वापरासाठी मान्यता मिळाली. ‘स्पुतनिक व्ही’ या लसीला १२ एप्रिल २०२१ रोजी वापरासाठी मान्यता देण्यात आली. मात्र, देशात अद्याप ‘स्पुतनिक व्ही’ या लसीचे डोस देणे सुरू झालेले नाही.
देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने १८ वर्षे व त्यावरील सर्व वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी १ मे २०२१ पासून मान्यता दिेलेली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार देशभरात आतापर्यंत १९ कोटी ८५ लाख लोकांचे लसीकरण झालेले आहे. त्यांपैकी १५ कोटी ५२ लाख जणांना पहिला डोस तर ४ कोटी ३३ लाख जणांना दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. देशात लसीचा तुटवडा असल्याने आता दुसरा डोस मिळवण्यासाठी विलंब होत आहे. त्यातच ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये किती कालावधी ठेवावा याबद्दल नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ‘आयसीएमआर’चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या तीन समित्यांनी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसच्या परिणामांसंदर्भात जी निरीक्षणे नोंदली, त्यांच्या आधारे या लसीच्या दोन डोसमधील अंतर आणखी वाढवण्यात आले आहे. कोव्हॅक्सीनच्या दोन डोसमध्ये चार ते सहा आठवड्यांचे अंतर राखण्यात आले आहे, तर कोविशिल्ड लसीच्या दोन डोसांमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर राखावे असा आदेश केंद्र सरकारने नुकताच जारी केला आहे. पूर्वी हे अंतर सहा ते आठ आठवड्यांचे होते.

आतापर्यंत देशभरात कोरोनासाठीच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या फक्त ४ कोटी ३३ लाख एवढी आहे. १३० कोटी लोकसंख्येच्या देशात ही संख्या फारच नगण्य म्हणावी लागेल.

केवळ ३ टक्के लसीकरण
भारतात आतापर्यंत केवळ ३ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण (म्हणजे दोन्ही डोस) झालेले आहे, तर अमेरिकेच्या एकंदर लोकसंख्येपैकी ३६ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे. भारतात पूर्ण लसीकरण होण्यात (सर्व नागरिकांना दोन्ही डोस) आणखी किमान तीन वर्षे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण १३० कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतासाठी लसीचे डोस मिळवणे हे एक मोठे आव्हान आहे.
रशियानिर्मित ‘स्पुतनिक व्ही’ या लसीचे ३० लाख डोस या महिन्याच्या शेवटपर्यंत भारतात दाखल होणार आहेत. तसेच ऑगस्ट महिन्यापर्यंत स्पुतनिक ही लस भारतात निर्माण केली जाऊ शकते, असे रशियातील भारतीय राजदूत डी. बाला व्यंकटेश वर्मा यांनी स्पष्ट केले आहे. भारतात ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे ८५ कोटी डोसचे उत्पादन केले जाऊ शकते. देशात ‘स्पुतनिक व्ही’ लसीची आयात करण्यासाठी परवानगी देण्यात आली असली तरी मागणीच्या प्रमाणात पुरवठा करणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे.

गोव्यातही लसीचा तुटवडा
मुळात देशातच कोरोनावरील लसीचा तुटवडा असल्याने राज्यांनाही या लसीचा तुडवडा जाणवू लागला असून, इवलेसे राज्य असलेला गोवाही त्याला अपवाद नाही. लसींचा तुटवडा असल्याने काही दिवसांपूर्वी गोव्यावरही लसीकरण पुढे ढकलण्याची पाळी आली होती.
गोव्यात सध्या फक्त ६ हजार लसी उपलब्ध असून त्या १८ ते ४४ या वटोगटातील लोकांसाठीच्या आहेत. आता सरकार या लसीचे डोस देताना स्तनपान करणार्‍या माता (ज्यांचे मूल दोन वर्षांखालील आहे) व १८ ते ४४ या वयोगटातील ज्या व्यक्तींना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत त्यांना प्राधान्य देणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ३६ हजार लसींचा साठा पोचेल अशी अपेक्षा आहे.

४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी २ लाख लसींचा साठा
४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी गोव्याकडे २ लाख ८ हजार एवढ्या लसींचा साठा आहे. त्यांपैकी १ लाख लसींचा साठा १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी वापरण्यात सरकारने केंद्राकडे परवानगी मागितली आहे. त्याशिवाय दोन खाजगी कंपन्यांकडून पंधरा लाख लसी सरकार मिळवणार आहे.

राज्यात ४,८७,९९८ लोकांचे लसीकरण
२५ मेपर्यंत राज्यात ४,८७,९९८ लोकांचे लसीकरण झाल्याची माहिती राज्यातील लसीकरण मोहिमेतील प्रमुख असलेले डॉक्टर राजेंद्र बोरकर यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली. त्यांपैकी २,९६,२६६ जणांना लसीचा एक डोस, तर ९५,८६६ जणांना दोन्ही डोस देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या १८ वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जसजसे लसीचे डोस उपलब्ध होतील तसतसे वरील वयोगटातील सर्वांचे पूर्ण लसीकरण (दोन्ही डोस) करण्यात येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

एका बाजूने देशात लसींचा तुटवडा असतानाच काही लोक घाबरून लस घेणे टाळू लागले असल्याने विविध राज्यांत मोठ्या संख्येने लसीचे डोस वाया जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मात्र, काही राज्यांनी लसीचे डोस वाया जाऊ नयेत यासाठी प्रयत्न चालवले असून निर्धारित वेळेत जास्तीत जास्त लोकांना लस टोचून डोस वाया जाण्यापासून वाचवले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि प. बंगाल या राज्यांनी लसीचे डोस वाया जाऊ नयेत यासाठी पुढाकार घेतला.

लसींच्या कुपीत निर्धारित डोसपेक्षा अधिक लस असते. त्यामुळे एक हजार लोकांसाठीचे डोस १००५ किंवा १००६ लोकांना देता येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, प. बंगाल, केरळ, ओडिशा अशा काही राज्यांनी वरीलप्रकारे लसीकरण करून लसीचे डोस वाया जाण्यापासून वाचवले, तर झारखंड, तामिळनाडू, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरात या राज्यांत लस वाया जाण्याचे प्रमाण मोठे आहे. झारखंड व तामिळनाडू राज्यांत लसी वाया जाण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असून झारखंडमध्ये ६.४४ टक्के, तर तामिळनाडूत ४.५५ टक्के एवढ्या लसी वाया गेल्या. लसीच्या कुपींसाठी (व्हायल) निर्धारित तापमान न राखणे आणि वापरातील एखादी कुपी खाली पडणे, तसेच लसीची कुपी एकदा उघडल्यानंतर सर्व डोस निर्धारित अवधीत न देणे ही लसीचे डोस वाया जाण्यामागील कारणे आहेत.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक तेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांनी कोविडवरील लस सर्व देशांना मिळण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. लस वितरणात जी असमानता आहे ती लाजीरवाणी अशी गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोविडवरील ७५ पेक्षा जास्त लसी आहेत. मात्र, जगातील फक्त १० देशांनाच आवश्यक तेवढ्या लसी मिळाल्या असल्याचे त्यांनी नजरेत आणून दिले आहे. काही देशांचे लहान समूह जगातील बहुसंख्य लसींची निर्मिती करीत आहेत आणि या लसींच्या विक्रीचे नियंत्रणही त्यांच्याकडेच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोविडमुळे होणारा आजार, मृत्यू हे थांबवणे व व्यवहार पुन्हा सुरू होणे आणि अर्थ व्यवहारांना गती मिळणे यासाठी जगभरात लसीकरण होणे आवश्यक असल्याचे घेब्रेयेसूस यांनी म्हटले असून ही सर्व देशांनी लक्षात घेण्यासारखी बाब आहे.

चौकट
टिका उत्सवाचे आयोजन
४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुलभ रीतीने व्हावे यासाठी सरकारने गेल्या बुधवार दि. २५ मेपासून राज्यात पुन्हा टिका उत्सवाचे आयोजन केले. त्यात पहिल्याच दिवशी २ हजार ५०९ व्यक्तींनी पहिला डोस घेतला. त्यात ४५ ते ६० या वयोगटातील लोकांचा समावेश होता, असे लसीकरण मोहिमेशी संबंधित सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
पहिल्या टप्प्यातील टिका उत्सवात ४५ वर्षांवरील ६० टक्के लोकांनी पहिला डोस घेतला होता. उर्वरित ४० टक्के लोकांचे लसीकरण या दुसर्‍या टप्प्यातील टिका उत्सवात करण्याचे आरोग्य खात्याचे लक्ष्य आहे. या दुसर्‍या टप्प्यात २ जूनपर्यंत २०० ठिकाणी शिबिरे होणार आहेत. या शिबिरांतून लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.