‘आयपीओ’तील गुंतवणूक

0
153
  • शशांक गुळगुळे

एखाद्या कंपनीला ‘आयपीओ’ काढायचा असेल तर त्यासाठी ‘सेबी’ची परवानगी लागते व ‘सेबी’ योग्य छाननी करूनच परवानगी देते. त्यामुळे ‘आयपीओ’तून पैसे गोळा करून पळणार्‍या कंपन्यांना चांगलाच चाप बसला आहे.

नजीकच्या भविष्यात गुंतवणूकदारांना ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग्ज’च्या- आयपीओच्या- संधी फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. बर्‍याच कंपन्या आपले ‘आयपीओ’ नजीकच्या भविष्यात ‘लॉंच’ करणार आहेत. गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का? आपण इतिहासाकडे बघितले तर १९९२ साली फार मोठ्या प्रमाणावर ‘आयपीओ’ लॉंच झाले होते. दिवसाला सरासरी पाच ते सहा कंपन्यांचे ‘आयपीओ’ भांडवली बाजारपेठेत प्रवेश करीत होते. त्याकाळात भारतीय अर्थव्यवस्थेवर ‘आयपीओ’चे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यानंतर हर्षद मेहता शेअर घोटाळा उघडकीस आला व ‘आयपीओ’ बाजारपेठ पूर्णतः उद्ध्वस्त झाली. बर्‍याच लोकांचे बरेच पैसे बुडाले. ‘आयपीओ’ विक्रीस काढलेल्या कित्येक कंपन्या, कित्येक प्रकल्प अस्तित्वातच आले नाहीत. त्या काळात ज्यांनी ‘आयपीओ’त गुंतवणूक केली त्या कंपन्यांचे शेअरबाजारात ट्रेडिंगच झाले नाही. गुंतवणूकदारांकडे त्यावेळच्या गुंतवणुकीची जर शेअर सर्टिफिकेट्‌स असतील तर ती आता फक्त रद्दीतच विकावी लागतील व कित्येकांनी फाडूनही टाकली असतील. हर्षद मेहता शेअर घोटाळ्यानंतर पुढील सुमारे २ वर्षे आयपीओचे अस्तित्वच नव्हते. आता पुन्हा भांडवली बाजारपेठेत ‘आयपीओ’ मुसंडी मारीत आहेत, तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? याबाबत गुंतवणूकदार साशंक आहेत.
२०२०-२१ या आर्थिक वर्षी ‘आयपीओ’त फार मोठ्या प्रमाणावर- गेल्या १० वर्षांत दुसर्‍या क्रमांकाची गुंतवणूक झाली.


‘आयपीओ’त झालेली गुंतवणूक

आर्थिक वर्ष गुंतवली गेलेली रक्कम

२०११-१२ ५९६४ कोटी रुपये
२०१२-१३ ६४३१ कोटी रुपये
२०१३-१४ १२०८ कोटी रुपये
२०१४-१५ २९५७ कोटी रुपये
२०१५-१६ १४ हजार ४२४ कोटी रुपये
२०१६-१७ २७ हजैर ४३८ कोटी रुपये
२०१७-१८ ८९ हजार ४७९ कोटी रुपये
२०१८-१९ १९ हजार ८०५ कोटी रुपये
२०१९-२० २१ हजार १५१ कोटी रुपये
२०२०-२१ ३९ हजार ६७६ कोटी रुपये

२०२१-२२ (आतापर्यंत) १० हजार २४५ कोटी रुपये

वरील आकडेवारीवरून हे लक्षात येते की, भारतीय गुंतवणूकदार ‘आयपीओ’तील गुंतवणुकीला जास्त परतावा मिळावा या हेतूने फार मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतात. सरसकट कोणत्याही ‘आयपीओ’त गुंतवणूक करू नका. ‘आयपीओ’च्या ‘मेरिट्‌स’वर गुंतवणूक करा. लॉंच होणार्‍या आयपीओंपैकी फक्त १० टक्के आयपीओच गुंतवणूक करण्यास योग्य असतात, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. अलीकडे ‘नझारा टेक्नॉलॉजीस’ या कंपनीचा आयपीओ प्रतिशेअर ११०१ रुपये या मूल्याने बाजारात विक्रीस आला होता. आता याचे शेअरबाजारात मूल्य १६८० रुपयांच्या दरम्यान आहे, तर कल्याण ज्वेलर्सचा ८७ रुपये मूल्याने विक्री झालेला शेअर आज शेअरबाजारात ६० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. ज्यांनी कल्याण ज्वेलर्सच्या ‘आयपीओ’त गुंतवणूक केली नसेल त्यांना आज तो शेअर कमी मूल्यात मिळू शकतो.

जशी शेअरबाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते तशी ‘आयपीओ’तील गुंतवणुकीतही जोखीम आहे. शेअरबाजारात ‘लिस्ट’ झालेल्या कंपनीबाबत जितकी माहिती उपलब्ध असते तितकी माहिती ‘आयपीओ’ विक्रीस काढलेल्या कंपनीबाबत नसते हा एक गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ‘मायनस पॉईंट’ ठरू शकतो. ‘आयपीओ’त गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचे प्रवर्तक, कंपनीचे व्यवस्थापन, त्यांचा इतिहास व ज्या क्षेत्रातील ही कंपनी आहे त्या क्षेत्रात या कंपनीचे स्थान याची माहिती गुंतवणूकदाराने करून घ्यावयास हवी.

साधारणपणे तीन प्रकारच्या कंपन्या आयपीओ लॉंच करतात. कंपन्यांना विस्तारासाठी किंवा नवीन उत्पादन निर्मितीसाठी किंवा अस्तित्वात असलेली कर्जे फेडण्यासाठी तसेच कॉर्पोरेट कारणासाठी खेळते भांडवल म्हणून निधीची आवश्यकता भासते. नवी यंत्रणा उभारण्यासाठी बँकांकडे गेल्यास गरजेइतके कर्ज संमत होईलच याची खात्री नसते. थोड्याशा कालावधीनंतर व्याज फेडावे, मूळ रक्कम फेडावी लागते. जर आयपीओतून पैसा जमविला तर त्यात व्याज द्यावे लागत नाही. लाभांश द्यावा लागतो; पण लाभांश दिलाच पाहिजे असा कायदा नाही. कंपनी नफ्यात असेल तरच लाभांश द्यावा लागतो. जनतेकडून गोळा केलेला पैसा कंपनीला परत करावा लागत नाही. शेअर लिस्ट झाल्यानंतर तो विकून गुंतवणूकदार नफा कमवू शकतो किंवा तोटा सोसू शकतो, त्यामुळे कंपन्या ‘आयपीओ’ लॉंच करायला प्राधान्य देतात.
‘आयपीओ’तून जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जाणार आहे यालाही महत्त्व द्यायला हवे. कंपनी जर ‘आयपीओ’तून जमा होणारा निधी विस्तारासाठी वापरणार असेल तर चांगले, पण कंपनीचे ‘अनलिस्टेड’ शेअर सध्या कोणाच्या तरी ताब्यात आहेत, त्यांना ते ‘आयपीओ’मार्गे विकायचे असतील तर अशा ‘आयपीओ’त गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते. जर मोठ्या वित्तीय कंपन्या एखाद्या ‘आयपीओ’त गुंतवणूक करीत असतील किंवा एलआयसी, सार्वजनिक उद्योगातील बँका वगैरे गुंतवणूक करीत असतील तर अशा ‘आयपीओ’त गुंतवणूक करावी. कारण यांनी कंपनीच्या आर्थिक स्थितीचा, भविष्याचा फार सूक्ष्मपणे अभ्यास केलेला असतो. एवढा ‘डीप’ अभ्यास करण्याची क्षमता/यंत्रणा आपल्याकडे नसते. त्यामुळे अशा कंपन्या जर एखादा ‘आयपीओ’ पसंद करीत असतील तर आपल्यासाठी अशात गुंतवणूक करणे कमी जोखमीचे ठरू शकते. ‘आयपीओ’ ‘लिस्ट’ झाल्यानंतर तत्काळ विकू नका. जर तुम्ही हे शेअर ‘होल्ड’ केले तर कदाचित भविष्यात जास्त परतावाही मिळू शकतो. शेअरबाजारात किंवा ‘आयपीओ’त गुंतवणूक करताना ती दीर्घमुदतीसाठीच करावी, तरच त्यातून चांगला फायदा होऊ शकतो.
शेअरबाजारात तेजीत असणार्‍या काही कंपन्या. या कंपन्यांचे ‘आयपीओ’ गेल्या तीन ते चार वर्षांत लॉंच झाले होते व आजचे या कंपन्यांच्या शेअरचे बाजारीमूल्य प्रचंड वाढलेले असून, या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलेले आहे. हा असा प्रचंड परतावा फक्त शेअरबाजारातील व्यवहारांतच मिळू शकतो.


प्रचंड तेजीतील कंपन्या
कंपनीचे नाव आयपीओची विक्री शेअरचे विक्रीस सध्याचा दर नफ्याचे प्रमाण
बंद झालेली तारीख काढल्यावेळचे बाजारीमूल्य टक्केवारीत

मूल्य रुपये (रुपये)

१) पॉलिकॅब (आय) ९ एप्रिल २०१९ ५३८.०० १६७५.३० २११.३९
२) आवास फायनान्सशिअर्स २७ सप्टेंबर २०१८ ८२१.०० २२९८.३० १७९.९४
३) मेट्रोपोलिस हेल्थ केअर ५ एप्रिल २०१९ ८८०.०० २३०६.७५ १६२.१३
४) एचडीएफसी ऍसेट २७ जुलै २०१८ ११००.०० २८२३.०५ १५६.६४
मॅनेजमेन्ट कंपनी

५) ग्लॅण्ड फार्मा लिमिटेड ११ नोव्हेंबर २०२० १५००.०० २७८२.८५ ८६.१९

या कंपन्या कशा फायद्यात गेल्या? या कशा तोट्यात गेल्या? याबाबतचे निश्‍चित ठोकताळे शेअरबाजारच्या बाबतीत मांडता येत नाहीत. तोटा का झाला? किंवा फायदा का झाला? यांचा अंदाजच वर्तविला जातो. शेअरबाजारात असेच होईल असे छातीठोकपणे कोणीही सांगू शकत नाही.

प्रचंड तोड्यात गेलेल्या कंपन्या
कंपनीचे नाव शेअर विक्री शेअरचे विक्रीमूल्य सध्याचा बाजारी तोटा

बंद झालेली तारीख (५ रुपयांत) दर (रुपयांत) टक्केवारीत

१) स्टर्लिंग ऍण्ड विल्सनन सोलर ८ जुलै २०१९ ७८०.०० २४३.६० -६८.७७ (वजा)
२) वारोक इंजिनिअरिंग २८ जून २०१८ ९६७.०० ३७६.३० -६१.१२ (वजा)
३) चार्लेट हॉटेल्स लिमिटेड ३१ जाने. २०१९ २८०.०० १४८.१० -४७.११ (वजा)
४) स्पंदन स्फूर्टी ७ ऑगस्ट २०१९ ८५६.०० ५८७.१० -३१.४१ (वजा)

५) कल्याण ज्वेलर्स इंडिया १८ मार्च २०२१ ८७.०० ६०.७० -३०.२३ (वजा)

दरम्यान, येत्या वर्षभरात गुंतवणूकदारांना भांडवली गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ६० हून अधिक एमएसएमई उद्योग येत्या वर्षभरात ‘आयपीओ’ लॉंच करणार आहेत. येत्या आर्थिक वर्षी १६ एमएसएमई कंपन्यांनी मुंबई शेअरबाजारात आयपीओ ‘लॉंच’ केले होते. यातून या कंपन्यांनी १०० कोटी रुपयांची उभारणी केली होती. एमएसएमई कंपन्यांनी भांडवल उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर ‘आयपीओ’ विक्रीस काढावेत व या उद्योगांनी भांडवली बाजारात सक्रिय व्हावे यासाठी छोट्या उद्योगांना प्रोत्साहन मुंबई शेअरबाजारातर्फे दिले जात आहे.

हर्षद मेहताच्या काळात गुंतवणूकदार जसे भरडले गेले तेवढे आता जाऊ शकत नाहीत. कारण हर्षद मेहता प्रकरणातून धडा घेऊन ‘सेबी’ या भांडवली बाजाराच्या नियंत्रक यंत्रणेने बरेच निर्णय घेतले, त्यामुळे गुंतवणूकदार आता पूर्वीइतके भरडले जाऊ शकत नाहीत. ‘आयपीओ’ विक्रीस काढल्यापासून त्याचे लिस्टिंग करण्याचा कालावधी बराच कमी केला. तसेच अगोदर शेअरसाठी अर्ज करताना भरलेली रक्कम कंपनीकडे जात असे व शेअरवाटप झाले नाही तर ते पैसे परत मिळविणेही गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी ठरत असे. आता ‘सेबी’ने एएसबीए (अस्बा) नियम केला आहे. या नियमाने गुंतवणूकदाराने अर्जासोबत भरलेली रक्कम बँकेकडेच राहते. जर शेअरवाटप झाले तर जितके शेअर वाटप झाले असेल तितकी रक्कम बँक ‘आयपीओ’ विक्रीस काढलेल्या कंपनीस देते. ज्याची रक्कम ‘अस्बा’मध्ये आहे, त्याला त्या रकमेवर बँकेतर्फे व्याजही मिळते. एखाद्याला ‘आयपीओ’ काढायचा असेल तर त्यासाठी ‘सेबी’ची परवानगी लागते व ‘सेबी’ योग्य छाननी करूनच परवानगी देते. त्यामुळे आयपीओतून पैसे गोळा करून पळणार्‍या कंपन्यांना चांगलाच चाप बसला आहे. तरुणांनी त्यांच्या वयाचा विचार करता शेअरबाजारातील गुंतवणुकीतच जोखमी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी मात्र डोळसपणे गुंतवणूक करावी.